तोलामोलाची 'कटट्यार काळजात घुसली'

By Admin | Updated: November 14, 2015 01:55 IST2015-11-14T01:55:19+5:302015-11-14T01:55:19+5:30

मराठी रंगभूमीवरच्या काही माईलस्टोन नाट्यकृतींमध्ये 'कट्यार काळजात घुसली' या नाटकाचेही नाव घेतले जाते. या नाटकाचे माध्यमांतर करत, त्यावर आधारित त्याच नावाचा चित्रपट पाहण्यासाठी

The peculiarities of 'peculiar painting' | तोलामोलाची 'कटट्यार काळजात घुसली'

तोलामोलाची 'कटट्यार काळजात घुसली'

मराठी रंगभूमीवरच्या काही माईलस्टोन नाट्यकृतींमध्ये 'कट्यार काळजात घुसली' या नाटकाचेही नाव घेतले जाते. या नाटकाचे माध्यमांतर करत, त्यावर आधारित त्याच नावाचा चित्रपट पाहण्यासाठी आपण सरसावून बसतो. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक सुबोध भावे याने मुळातच, हा चित्रपट म्हणजे 'कट्यारङ्घ' हे नाटक नव्हे; याची अनेकदा मनात आधीच रुजवात केली असल्याने, यात वेगळे काय पाहायला मिळणार याविषयीचे औत्सुक्य दाटून आलेले असते. अशावेळी समोर येतो तो एक भव्य कॅनव्हास आणि त्यावर रेखीव रंगलेपन करत रेखाटलेली रागदारी कलाकृती ! इथेच, पूर्णत: चित्रपटमय झालेली ही कट्यार मनाचा ठाव घेते आणि या माध्यमांतराचा मेळही चांगला जमून आल्याचे दाखवून देते.
पंडित भानुशंकर शास्त्री हे विश्रामपूर येथील विष्णुराज राजाच्या दरबारी असलेले राजगायक. राजदरबारात त्यांचे प्रस्थही मोठे आणि त्यांना मिळणारा मानसन्मानही मोठा असतो. मिरजच्या एका संगीत मैफिलीत त्यांची भेट संगीत घराण्याचा अपार अभिमान असलेल्या खाँसाहेबांशी होते आणि पंडितजी त्यांना राजदरबारी घेऊन येतात. विजयादशमी साजरी करण्याचा एक प्रघात म्हणून विष्णुराज राजा दरवर्षी संगीत स्पधेर्चे आयोजन करत असतो आणि त्यात विजयी होणाऱ्या गायकाला एक बहुमोल कट्यार भेट दिली जाते. गायकांच्या मांदियाळीत आपल्या स्वराने उच्चस्तरावर पोहोचलेल्या पंडितजींचा निर्विवाद अधिकार आतापर्यंत या कट्यारीवर चालत आलेला असतो. भोवताली त्यांच्या तोलामोलाचा गायक नसल्याने ही ठेव पंडितजींकडेच सुरक्षित असते. पण राजदरबारी आलेले खाँसाहेब त्यांना आव्हान देत विडा उचलतात. मात्र दरवर्षीप्रमाणेच यात पंडितजी विजयी होतात. खाँसाहेबांना हा अपमान सहन होत नाही. साहजिकच, या दोघांत ठिणगी पडते आणि खाँसाहेबांच्या मनात किल्मिष उत्पन्न होत, अभिमान व अहंकाराची ही स्पर्धा वेगळ्याच थराला जाऊन पोहोचते.
रसिकजनांच्या मनाचा एक कोपरा 'कट्यार काळजात घुसली' या नाट्यकृतीने कायमस्वरूपी व्यापला असल्याने, त्यावर चित्रपट करणे हे दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेच्या समोर आव्हानच होते. ते त्याने सर्वसामर्थ्यानिशी पेलण्याचा प्रयत्न केला आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या मूळ कथेवर प्रकाश कपाडिया यांनी लिहिलेली पटकथा उत्तम असून, त्यांचे संवादही चित्रपटात चपखल बसले आहेत. कथेपेक्षा संगीत हाच या चित्रपटाचा प्राण आहे आणि त्यानुसार तब्बल २१ गाण्यांच्या स्वरसाथीने ही 'कट्यारङ्घ' नटलेली आहे. पण इतकी गाणी असूनही त्यांचा कथेवर परिणाम होऊ न देण्याची सुबोध भावेने खबरदारी घेतली आहे.
ही गाणी या कथेचा एक भाग म्हणूनच सादर होतात आणि त्यांची बेमालूम गुंफण चित्रपटात केलेली दिसते. पं.जितेंद्र अभिषेकी यांचे मूळ संगीत आणि त्यात शंकर-एहसान-लॉंय यांनी गायकांसह घातलेली संगीतमय भर जुळून आली आहे. चित्रपट पडद्यावर उत्तम दिसतो आणि त्याचे हे दिसणे प्रसन्न आहे. सुधीर पलसाने यांच्या छायांकनाने दृष्ट लावण्याजोगे काम केले आहे. मात्र आतापर्यंत ब?्याच चित्रपटांत दिसलेल्या 'यू' आकाराच्या नदीच्या क्लिपची वारंवारता मात्र खटकते. पंडितजी आणि खाँसाहेब यांच्यातल्या जुगलबंदी ऐवजी, खाँसाहेब आणि सदाशिव यांच्यात रंगणारी जुगलबंदी प्रथमदर्शनी न पटण्याजोगी वाटत असली, तरी हे या चित्रपटाचे वेगळेपण ठरले आहे.
गायक व संगीतकार म्हणून ओळख असलेले शंकर महादेवन यांना पंडितजींच्या भूमिकेत अभिनय करताना पाहणे हे यातले 'सरप्राईज' आहे आणि असाध्य ते साध्य करून दाखवत सुबोध भावेने त्यांची वेगळी ओळख या चित्रपटातून निर्माण केली आहे. शंकर महादेवन यांच्या भूमिकेचे फूटेज तसे कमी असले, तरी त्यांनी त्यात दाखवलेली अदाकारी उत्तम आहे. संगीतासोबत या चित्रपटाचा 'यूएसपी' ठरू शकेल अशी गोष्ट म्हणजे खाँसाहेबांची भूमिका साकारणारे सचिन पिळगावकर ! खलनायकी छटा असणारे, पण क्या बात है!असे म्हणायला भाग पाडणारे खाँसाहेब त्यांनी यात रंगवले आहेत. मुळात उर्दूवर प्रभुत्व असलेल्या सचिन पिळगावकर यांच्यासाठी ही भूमिका अगदी फिट्ट आहे आणि त्यांनी तिचे सोने केले आहे. वेशभूषा आणि रंगभूषेचेची तितकीच उत्तम साथ कलाकारांना मिळाली आहे.
पंडितजींचा शिष्य असलेल्या सदाशिवच्या भूमिकेला सुबोध भावेने न्याय दिला असला, तरी त्यापेक्षा 'दिग्दर्शक' सुबोध भावे ही त्याची या चित्रपटातली कामगिरी अधिक सरस आहे. यातली मृण्मयी देशपांडेची उमा खास आहे आणि अमृता खानविलकरची झरिना सुद्धा मनावर ठसते. त्यांना पुष्कर श्रोत्री, साक्षी तन्वर, स्वप्नील राजशेखर आदी कलावंतांची चांगली साथ लाभली आहे. संगीत रंगभूमी ते मोठा पडदा अशी वाटचाल केलेली ही संगीतमय 'कट्यार' म्हणजे ऐन दिवाळीच्या माहोलात खास अनुभवण्याची बाब आहे.

Web Title: The peculiarities of 'peculiar painting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.