पाडव्याला लग्नाला यायचंच...
By Admin | Updated: November 10, 2015 00:51 IST2015-11-10T00:51:52+5:302015-11-10T00:51:52+5:30
प्रशस्त मंडप, सनईचे मधुर सूर, वरात्यांची लगबग, भरजरी आणि डिझायनर कुर्ते परिधान केलेले सुहास्यवदन यजमान आणि प्रचंड उत्साह...

पाडव्याला लग्नाला यायचंच...
पुणे : प्रशस्त मंडप, सनईचे मधुर सूर, वरात्यांची लगबग, भरजरी आणि डिझायनर कुर्ते परिधान केलेले सुहास्यवदन यजमान आणि प्रचंड उत्साह... हे वातावरण कोणत्याही लग्नसमारंभाला शोभेल असेच. पण ते आहे लग्नसमारंभाआधीच्या एका विशेष सोहळ्याचे! ‘मुंबई पुणे मुंबई - २ लग्नाला यायचंच’मधल्या लाडक्या जोडीच्या लग्नाची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली असताना या सोहळ्यामधील ‘बँड बाजा वरात घोडा’ हे गाणे मोठ्या उत्साहात मुंबईत प्रकाशित झाले. चित्रपट पाडव्याच्या दिवशी १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
पाय थिरकायला लावणारे हे वरातगीत अगदी झकास जमून आले असून येणाऱ्या काळात ते महाराष्ट्राचे वरातगीत म्हणून मान्यता पावेल, अशी अटकळ आहे. मराठीतील चॉकलेटबॉय स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांना आशीर्वाद द्यायला चित्रपटाची संपूर्ण टीम अर्थात, प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, दिग्दर्शक सतीश राजवाडे, मिराह एन्टरटेनमेंटचे अमित भानुशाली आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेंटचे संजय छाब्रिया आदी उपस्थित होते. चित्रपटाच्या पहिल्या गाण्याप्रमाणेच हे दुसरे गीतही वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात रसिकार्पित झाले आहे.
पहिले गीत ‘साथ दे तू मला...’ दोन आठवड्यांपूर्वी स्वप्निल आणि मुक्ता यांनी तरुणांसमोर संवाद साधत प्रकाशित केले होते. या गीताला १ लाखांपेक्षा जास्त हिटस यूट्यूबवर मिळाले आहेत.
‘मुंबई पुणे मुंबई’ या नितांत सुंदर चित्रपटाला अवघ्या मराठी तरुणाईने पसंतीची दाद दिली. त्यामुळे दुसऱ्या
भागाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. स्वप्निल-मुक्ताच्या लग्नापर्यंतच्या या प्रवासात त्यांच्यासमवेत स्वप्निल, मुक्ताबरोबरच सुहास जोशी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे,
विजय केंकरे, मंगल केंकरे, आसावरी जोशी, श्रुती मराठे अशी देखणी आणि दिग्गज मंडळी पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळेही या सिक्वेलची उत्सुकता अधिक वाढली आहे. सहकुटुंब सहपरिवार येत्या १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरील महाराष्ट्रातील या लाडक्या लग्नाला यायचंच! असे आग्रहाचे निमंत्रण चित्रपटाच्या टीमने दिले आहे.