आॅर्केस्ट्रा सिंगर ते संगीतकार!
By Admin | Updated: January 13, 2016 02:45 IST2016-01-13T02:45:08+5:302016-01-13T02:45:08+5:30
प्रत्येक माणूस कोणतातरी छंद घेऊन जगत असतो. त्यातूनच त्याला सजीवपण टिकवून ठेवता येते. त्याला थोडीफार जीवनाकडे बघण्याची दृष्टी मिळते, असे म्हटले जाते.

आॅर्केस्ट्रा सिंगर ते संगीतकार!
प्रत्येक माणूस कोणतातरी छंद घेऊन जगत असतो. त्यातूनच त्याला सजीवपण टिकवून ठेवता येते. त्याला थोडीफार जीवनाकडे बघण्याची दृष्टी मिळते, असे म्हटले जाते. त्यामुळेच की काय आपल्या आजूबाजूला आपण पाहिले तर अशी अनेक वेगळी छंदीफंदी माणसं दिसतात. त्यापैकीच सचिन अवघडे हा एक तरुण. शाळकरी मुलगा असतानाच गाण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच परिस्थितीशी दोन हात करून रडत रडत नव्हे तर गाणं म्हणत पडणाऱ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर आयुष्य सुंदर बनविणाऱ्या शाळकरी मुलांपैकी एक सचिन.
मित्रांचा एक छोटेखानी ग्रुप तयार करून गाण्यांचा सराव करता करताच एका आॅर्केस्ट्राची तयारी झाली. आणि त्या माध्यमातून छोटेमोठे कार्यक्रम करीत सचिन म्युझिकल नाइट्स नावाचा आॅर्केस्ट्रा जन्माला आला. औंध रोडवर राहणाऱ्या सचिनला गाणं नेहमी अस्वस्थ करीत राहिलं. त्यातूनच आॅर्केस्ट्रामध्ये गाणं म्हणत म्हणत सचिन हळूहळू इतर वाद्येही वाजवायला शिकला. त्यानंतर त्याच्यातल्या संगीतकाराने भरारी घेतली आणि आज चित्रपटातील अनेक गीतांना त्याने संगीत दिले आहे. तसेच साधारण ५० अल्बमला त्याने संगीत दिले आहे.
आॅर्केस्ट्रा ते संगीतकार हा प्रवास अनेक टप्प्यांवर नवनव्या संगीतक्षेत्रातील बदलांबरोबरच नव्या कल्पना देत गेला. सचिनने त्या नव्या बदलांना स्वीकारून कोणत्याही प्रकारचे गीत-संगीत वर्ज न मानता सर्व प्रकारातील गाण्यांना संगीत दिले. खेळ प्रेमाचा, सांभाळ माझ्या बाळाला, घायाळ हरणी, कसं काय मामा बरं हाय का, अशा काही चित्रपटांतील गाण्यांना सचिनने संगीत दिले आहे. टाइम ओव्हर, माणदेशी वाघीण, एका छताखाली या आगामी चित्रपटांतील काही गीतांना सचिनने संगीत दिले आहे. स्वप्निल बांदोडकर, रवींद्र साठे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, रेश्मा सोनवणे, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, कविता निकम आदी गायकांनी गायिलेल्या गाण्यांना सचिनने संगीत दिले आहे.
प्रत्येकाने आपली वेगळी एक टीम तयार केली आहे. त्यामुळे नव्या दमाच्या संगीतकारांनाही संधी मिळणे आवश्यक असल्याचे सचिनचे मत आहे.
लोकगीतांसह बॉलीवूडमध्ये चालणारी गाणीदेखील आम्ही संगीतबद्ध केल्याचे सचिन सांगतो. डी. जे. चेतन म्हात्रे, विनायक लोकरे, रत्नदीप कांबळे, नीलेश आडकर, दीपक गायकवाड, स्वप्निल पवार अशा मित्रांच्या सहकार्यामुळे आपण संगीतबद्ध केलेली गाणी लोकांपर्यंत पोचली, असे सचिन अवघडे यांनी सांगितले.