‘वन टाईम प्रोड्युसर’मुळे वाढतेय चित्रपटांची संख्या

By Admin | Updated: October 16, 2015 02:12 IST2015-10-16T02:12:23+5:302015-10-16T02:12:23+5:30

अभ्यास करून तिने एमबीबीएस केले आणि डॉक्टर झाली. नंतर हे क्षेत्र बदलून किराणा घराण्यातील गुरू विभावरी बांधवकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले,

The number of films that grow due to 'One Time Producer' | ‘वन टाईम प्रोड्युसर’मुळे वाढतेय चित्रपटांची संख्या

‘वन टाईम प्रोड्युसर’मुळे वाढतेय चित्रपटांची संख्या

अभ्यास करून तिने एमबीबीएस केले आणि डॉक्टर झाली. नंतर हे क्षेत्र बदलून किराणा घराण्यातील गुरू विभावरी बांधवकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले, एवढेच नाही तर संगीतकार अनिल मोहिले यांच्याकडून लाईट म्युझिकचेही शिक्षण घेतले.. त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या ‘माणूस’ या चित्रपटातील गाजलेले गाणे ‘दिन दिन दिवाळी’ हे पहिले गाणे तिने गायले आणि गायन क्षेत्राकडे तिची वाटचाल सुरू झाली. हिंदी चित्रपटातही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बंगाली, कन्नड, तेलगू, सिंधी आणि गुजराती भाषांमध्येही तिने अनेक गाणी गायली. अंताक्षरी या कार्यक्रमासाठी तिने अ‍ँक रिंगही केले. या गायिकेचे नाव नेहा राजपाल. पण तरीही अजूनही काहीतरी आपल्याकडून राहतंय अशी नेहाला खंत होती... ही खंत तिने दूर केली विजय मौर्या लिखित आणि दिग्दर्शित ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाची निर्माती होऊन. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रातील आलेले अनुभव नेहा राजपालने ‘सीएनएक्स’शी बोलताना शेअर केले.
सध्या असे अनेक निर्माते असे आहेत, की जे येतात...एका चित्रपटाची निर्मिती करतात आणि फायदा झाला तर पुढचा चित्रपट काढतात, नाहीतर गायब होतात. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो, की चित्रपटांची संख्या फक्त वाढते आणि त्याचा फटका वर्षानुवर्षे या क्षेत्रात असलेल्या निर्मात्यांनाही बसतो. त्यामुळे वन टाईम प्रोड्युसर्सनी निर्मिती क्षेत्रात येण्यापूर्वी पूर्ण विचार करूनच यायला हवे. या क्षेत्रात यायचेच असेल तर अनुभवी निर्मात्यांच्या सहयोगाने यावे. निर्मिती क्षेत्रात चांगली कथा, पटकथा, चित्रपटाच्या कथेला सूट होईल असेच कास्टिंग निवडणे, शूटींगच्या वेळी येणाऱ्या समस्या, एडिटिंग आणि सर्वांत शेवटचे म्हणजे प्रमोशन, यातील प्रत्येकच टप्पा आव्हानात्मक आहे.
आपल्याकडे शक्यतो पटकथेवर विशेष काम केलं जात नाही. तयार कथा घेऊनच त्यावर पटकथा तयार केली जाते. पण आम्ही सर्वांत पहिले मार्केट रिसर्च करून लोकांना काय बघायला आवडेल याचा वेध घेतला. कारण आपण बनवणार एक आणि लोकांना ते आवडलंच नाही तर चित्रपटाच्या टीमचा आणि दोन्हीचा वेळ फुकट जातो. त्यामुळे लोकांना आवडेल अशी कथा तयार करतानाच लोकांना आवडेल ना हा विचार केला आणि त्याबरोबरच ती सहज प्रमोट करता येईल ना असा उलटा विचार केला. आमच्या चित्रपटाच्या टीमने कास्टिंगसाठी जवळपास आठ महिने मेहनत घेतली.
>>चित्रपटांची तारखेसह
यादी प्रसिद्ध करायला हवी
सध्या वेगवेगळ्या विषयांवर इतके चित्रपट येत आहेत की एका आठवड्याला तीन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. कितीही बिग बजेट किंवा मोठे चित्रपट येणार असले तरी त्यांनी सहयोगाने चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरवणे गरजेचे आहे. त्याबरोबरच त्यांच्या प्रदर्शनाची तारीख प्रसिद्ध करणारी आणि एका वेळेला किती आणि कोणते चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात, हे ठरवणारी समिती तयार करायला हवी. त्या समितीने आगामी चित्रपटांची तारखेसह यादी तयार करून ती प्रसिद्ध करायला हवी.
>>निर्मितीचे क्षेत्र क्रिएटिव्ह
मी डॉक्टर असल्याने मला असं वाटतं की, अनेक गोष्टी एक्स्प्लोअर करायच्या बाकी राहतात, त्यामुळे मी डॉक्टरीनंतर गायिका, अ‍ँकर, संगीतकार या सगळ्या क्षेत्रात काम केले. आता पुढे काय, असा प्रश्न माझ्यापुढे होता त्यावेळेला परफेक्ट वळण म्हणजे निर्मिती क्षेत्र हे असू शकतं. कारण मराठी चित्रपटांना सुगीचा काळ आला आहे, लोक चांगला प्रतिसाद देत आहेत. वेगवेगळे विषय हाताळले जात आहे आणि केवळ बॉक्स आॅफिसवरच हिट ठरत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घ्यायला भाग पाडत आहेत. निर्माती म्हणून अनेक गोष्टी एका वेळेला हाताळता येतात आणि शिकायलाही मिळतात. चित्रपट बनवतानाचे विविध कंगोरे या क्षेत्रात समजतात. कथा, पटकथा, कास्टिंग, शूटिंग, पोस्ट प्रॉडक्शन ते प्रमोशनपर्यंतची प्रत्येक गोष्ट आपल्याला जवळून पाहाता आणि शिकता येते. त्यामुळे मी निर्मिती या क्रिएटिव्ह क्षेत्रात येण्याचा निर्णय मी घेतला.

Web Title: The number of films that grow due to 'One Time Producer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.