प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:50 IST2021-11-03T14:49:24+5:302021-11-03T14:50:03+5:30
Shafeeq ansari: 'बागबान' चित्रपटाचं लेखन करणाऱ्या शफीक अन्सारी यांच्या निधनाची माहिती मिळताच कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी यांचं निधन
प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी(shafeeq ansari) यांचं दीर्घकालीन आजारामुळे निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून शफीक अन्सारी आजारी होती. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. त्यांचा मुलगा मोहसीन अन्सारी यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.
'बागबान' चित्रपटाचं लेखन करणाऱ्या शफीक अन्सारी यांच्या निधनाची माहिती मिळताच कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शफीक यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशिवारातील दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
1974 पासून केली होती करिअरला सुरुवात
1974 मध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या शफिक यांनी 'दोस्त' या चित्रपटाच्या पहिल्यांदा स्क्रिप्ट लिहिली होती. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुख्य भूमिका होती. त्यानंतर 1990 मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 'दिल का हीरा' चित्रपटासाठी देखील त्यांनी स्क्रिप्ट लिहिली. त्यानंतर त्यांनी २००३ साली लोकप्रिय ठरलेल्या 'बागबान' या चित्रपटासाठी लेखन केलं होतं. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आणि त्याची कथा त्याकाळी प्रचंड गाजली होती.