विशेष मुलांसाठी सामान्य जीवन शक्य
By Admin | Updated: June 1, 2016 02:40 IST2016-06-01T02:40:06+5:302016-06-01T02:40:06+5:30
‘समाजात नेहमीच विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना पाहताच क्षणी मनातून सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला जातो.

विशेष मुलांसाठी सामान्य जीवन शक्य
‘समाजात नेहमीच विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना पाहताच क्षणी मनातून सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना सामान्य माणसांप्रमाणे जगू देत नाही, त्यांना ती जाणीव नकळतपणे करून दिली जाते, पण ही विशेष मुलेदेखील सामान्य मुलांप्रमाणे जगू शकतात. त्यांना तशी वागणूक द्या,’ असे सांगणाऱ्या ‘लालबागची राणी’ या चित्रपटातून विशेष मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री वीणा जामकर हिने लोकमत ‘सीएनएक्स’शी साधलेला संवाद...
‘लालबागची राणी’ या चित्रपटातील तुझ्या अभिनयाबद्दल सांग.
- या चित्रपटात मी संध्या नावाच्या विशेष मुलीची भूमिका साकारली आहे. हे माझ्यासाठी खूप चॅलेजिंग काम होतं. पण यामध्ये मी स्पेशल चाइल्ड असले तरी ती सहानुभूती मला देण्यात आली नाही. मी अशी असूनदेखील माझ्यात काहीतरी खास आहे. त्याचबरोबर याबाबत कोणतीही तक्रार न करता मी आनंदी जगते, तर सामान्य माणसे का जगत नाही, असे दुहेरी सकारात्मक चित्र या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.
या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिकेसाठी काही विशेष तयारी करावी लागली का?
- हो. या भूमिकेसाठी गुगल व पुस्तकांच्या माध्यमातून वाचण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून समाधानकारक असे काही मिळाले नाही. कारण पुस्तक वगैरे वाचून कॅरेक्टर काही उभे राहत नाही. म्हणून काही विशेष मुलांना जाऊन भेटले. त्या वेळी मला माझं कॅरेक्टर सापडलं. तसेच या निरागस मुलांमुळे मला माझ्या भूमिकेला शंभर टक्के न्याय देता आलं.
तुला याविशेष मुलीच्या भूमिकेसाठी साहजिकच रिटेकदेखील द्यावे लागले असेल.
- नाही. याचे श्रेय मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना देते. कारण त्यांनी या भूमिकेकडे खूप छान लक्ष दिले. कधी शूटिंगच्या दरम्यान गर्दी झाली तर मी खूप पॅनिक व्हायचे. त्या वेळी काय करू असं व्हायचं; पण या वेळी दिग्दर्शक लक्ष्मण म्हणायचे, तू फक्त कॅरेक्टर सांभाळ. इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नको. म्हणतात ना, दिग्दर्शकाचं कंट्रोल असेल तर अशा भूमिका करणंही अधिक सोपं जातं.
असं ऐकलं की, या चित्रपटाच्या दरम्यान तुझा अपघात झाला होता?
- हो, थोडक्यात वाचले; म्हणून तर मी आज प्रमोशनला आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक असा सीन होता, की माझे फुगे हातातून सुटतात. त्या वेळी मी माझे फुगे करत त्या फुग्यांच्या मागे पळते. त्या वेळी अचानक एक गाडी आडवी येते. पण हा गाडीचा ड्रायव्हर नवीन असल्यामुळे त्याच्यामध्ये तो जोश होता. लक्ष्मण अॅक्शन म्हणताच, तो स्पीडमध्ये निघाला; पण काही कळण्याच्या आतच गर्दीतील एका माणसाने मला जोरात ओढले आणि थँक्स गॉड! त्या वेळी मी थोडक्यात बचावले.
विशेष मुलीची भूमिका साकारताना तुला कसे वाटले?
- विशेष मुलीची भूमिका साकारताना मला अतिशय आनंद झाला. टपाल, सप्तपदी, कुटुंब या चित्रपटांत माझ्या गंभीर भूमिका होत्या. पण या चित्रपटाच्या माध्यमातून जी गंभीर भूमिका असल्याची इमेज तयार झाली होती, तिला ब्रेक करण्याची संधी मिळाली. तसेच यामध्ये मी एकदमच मनोरंजक अशी भूमिका केलेली आहे आणि ही भूमिका माझ्यासाठी एक चॅलेंज होतं.
तू हे आयुष्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्यक्ष जगली आहेस. त्यामुळे या मुलांच्या माध्यमातून तू समाजाला काही संदेश देऊ इच्छिते का?
- पहिल्यांदा मी विशेष मुलांचा सांभाळ करणाऱ्या पालकांचा खरंच मनापासून सलाम करते. तसेच समाजाने या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांना सामान्य मुलांसारखी वागणूक देणे आवश्यक आहे. त्यांना भरभरून प्रेम दिले पाहिजे. तसेच हा चित्रपट पाहिल्यानंतरदेखील समाज या मुलांच्या बाबतीत नक्कीच बदलेल, असे वाटते.