अशा विनोदवीरांना वेसण घालण्याची गरज
By Admin | Updated: June 6, 2016 01:19 IST2016-06-06T01:19:41+5:302016-06-06T01:19:41+5:30
आपल्या शोमध्ये तन्मय भट याने लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्याबाबत ज्या प्रकारचा विनोद केला त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन करणे

अशा विनोदवीरांना वेसण घालण्याची गरज
लोकमत स्पेशल - अनुज अलंकार
आपल्या शोमध्ये तन्मय भट याने लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्याबाबत ज्या प्रकारचा विनोद केला त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन करणे एक प्रकारची क्रूरता ठरेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तन्मयसारख्या लोकांकडे दुर्लक्ष केले गेले, तर ही विकृत मानसिकता मनोरंजनाच्या नावाखाली समाजरचनेचे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. तन्मयने यापूर्वीही असाच भयंकर उपद्व्याप केला होता. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले नसते, तर लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर या ‘भारतरत्नां’ची टिंगलटवाळी करण्याची त्याची हिंमत झाली नसती. तन्मयने यापूर्वी मोठ्या ताऱ्यांच्या उपस्थितीत शिव्यांचा कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम एवढा भयंकर होता की, पाहणाऱ्यांना माना खाली घालाव्या लागल्या होत्या. मात्र, तेव्हा शोपेक्षा ताऱ्यांच्या उपस्थितीची अधिक चर्चा झाली आणि प्रकरण निवळले. त्यामुळे तन्मयची हिंमत वाढली व त्याने आता लता मंगेशकर आणि सचिन यांना लक्ष्य करून त्यांच्या लाखो चाहत्यांची मने दुखावली. जे लोक तन्मयच्या या कृतीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांची मानसिकताही सामान्य म्हणता येणार नाही. तन्मयने आपल्या कार्यक्रमात हे लोक किंवा त्यांच्या कुटुंबाबाबत असाच आयटम सादर केला, तर हे लोक अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य विसरून आपल्या अपमानाबाबत गळा काढताना दिसतील.
मान्यवरांबाबत विनोद करण्याची जुनी परंपरा आहे. जॉनी लिव्हरपासून राजू श्रीवास्तवपर्यंत अनेक कलावंतांनी दिग्गज व्यक्तींबाबत ‘स्टँड अप शो’ केले आहेत. अनेक वेळा संबंधित दिग्गजांनी त्यांच्यावरील शोचा आनंदही लुटला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कॉमेडीच्या नावाखाली लोकांना अपमानित करण्याचे प्रकार सुरू झाले असून, हे सत्र वाढतच चालले आहे. तन्मयसारख्या लोकांना वेसण घालण्याची वेळ आता आली आहे. यापुढे कॉमेडीच्या नावाखाली कोणाला अपमानित केले जाऊ नये यासाठी अशा लोकांवर कारवाई करण्यात यायला हवी.