पत्नीविरोधातील नवाजुद्दीन सिद्दिकीचा दावा फेटाळला; सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:05 IST2025-10-11T10:05:20+5:302025-10-11T10:05:39+5:30
शामसुद्दीन आणि अंजना यांना मानहानिकारक मजकूर प्रकाशित करण्यापासून कायमस्वरूपी रोखण्यात यावे.

पत्नीविरोधातील नवाजुद्दीन सिद्दिकीचा दावा फेटाळला; सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने कोर्टाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने त्याची पत्नी अंजना पांडे आणि धाकटा भाऊ शामसुद्दीन सिद्दीकी यांच्या विरोधात दाखल केलेला १०० कोटी रुपयांचा मानहानीची दिवाणी स्वरूपाचा दावा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने सिद्दीकी व त्याचे वकील सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने हा दावा फेटाळला.
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मागण्या काय होत्या?
शामसुद्दीन आणि अंजना यांना मानहानिकारक मजकूर प्रकाशित करण्यापासून कायमस्वरूपी रोखण्यात यावे.
त्यांनी सार्वजनिक माफी मागावी आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स हटवाव्यात, तसेच त्यांनी कोणत्या लोकांपर्यंत खोटी माहिती पोहोचवली त्याचा खुलासा करावा. त्यांच्या मालमत्ता विक्रीवर बंदी घालावी, जेणेकरून नुकसानभरपाई वसूल करण्यात अडचण येऊ नये, अशा मागण्या नवाजुद्दीन सिद्दीकीने केल्या होत्या. मात्र, न्यायालयाने हा दावा फेटाळला.
खोटे खटले व ब्लॅकमेलिंगचे आरोप
नवाजुद्दीनने दावा केला की, याबाबत चौकशी केल्यावर शामसुद्दीनने त्याच्या माजी पत्नीला खोटे खटले दाखल करण्यास प्रवृत्त केले, तसेच अंजना पांडेने विवाहापूर्वी ती अविवाहित मुस्लीम असल्याचे सांगितले; परंतु प्रत्यक्षात ती विवाहित होती. याशिवाय, शामसुद्दीन व अंजनाने मिळून २० कोटी रुपये अपहार केले, तसेच नवाजुद्दीनकडून मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा १० लाख रुपये आणि प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्यासाठी दिलेले २.५ कोटी रुपये स्वत:च्या खचार्साठी वापरल्याचा आरोप दाव्याद्वारे करण्यात आला आहे.
२०२० मध्ये सिद्दीकीने भावाकडून काम काढल्यानंतर त्याला इन्कम टॅक्स, जीएसटी आणि इतर शासकीय विभागांकडून ३७ कोटी रुपयांच्या थकबाकीच्या नोटिसा आल्या. त्यानंतर, मालमत्ता परत मागितल्यावर शामसुद्दीन आणि अंजना यांनी सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ व पोस्ट टाकून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला, असे दाव्यात म्हटले आहे.
याचिकेनुसार, नवाजुद्दीन याने २००८ मध्ये भाऊ बेरोजगार असल्याने त्याला व्यवस्थापक नेमले. त्याच्याकडे सर्व आर्थिक कामे होती. नवाजुद्दीन यांनी त्याला क्रेडिट, डेबिट, एटीएम कार्ड, स्वाक्षरी केलेली चेकबुक, बँक पासवर्ड आदी सर्व दिले. मात्र, शामसुद्दीनने अनेक मालमत्ता स्वत:च्या नावावर घेतल्या.