'खिसा' लघुपटासाठी अकोल्याचे राज मोरे यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:54 IST2021-03-23T17:10:55+5:302021-03-23T19:54:49+5:30
National Film Award to Raj More of Akola for his short film 'Khisa' सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा भारत सरकार कडून करण्यात आली आहे.

'खिसा' लघुपटासाठी अकोल्याचे राज मोरे यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
अकोला : अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या अकोल्याचे दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांच्या 'खिसा' या मराठी लघुपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातही बाजी मारली आहे. बिगर चित्रपट- लघुपट (Non -feature film Categorey-Short Film) या श्रेणीत दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा भारत सरकार कडून करण्यात आली आहे. पी.पी. सिने प्रॉडक्शन मुंबई आणि लालटिप्पा निर्मित या चित्रपटासाठी संतोष मैथानी आणि राज प्रीतम मोरे यांचे सहकार्य लाभले आहे. लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अकोला येथे झाले आहे.
खिसा ही कथा देशाच्या सामाजिक वातावरणावर आणि खेडेगावातील आजही संकुचित असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य करणारी आहे. महाराष्ट्रातील एका लहान गावात इतर मुलांच्या खिशापेक्षा मोठा खिसा शिवून घेणाऱ्या मुलाची खिशात न मावणारी व मन हेलावून टाकणारी ही कथा आहे.
या लघुपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका असून पारिजात चक्रवर्ती यांचे संगीत लाभले आहे. संकलनाची धुरा संतोष मैथानी यांनी सांभाळली असून सिमरजितसिंह सुमन यांनी फोटोग्राफीचे दिग्दर्शन केले आहे.