अस्वस्थ वास्तवाची रहस्यमय गुंफण

By Admin | Updated: June 28, 2015 01:00 IST2015-06-28T01:00:55+5:302015-06-28T01:00:55+5:30

अवघ्या दोन व्यक्तिरेखांवर चित्रपट उभा करणे हे तसे धाडसाचे आणि तितकेच कठीण काम. या व्यक्तिरेखांवर सतत खिळून राहणारे लक्ष, त्यायोगे त्यांच्यावर येऊन

The mysterious rhyme of unhealthy reality | अस्वस्थ वास्तवाची रहस्यमय गुंफण

अस्वस्थ वास्तवाची रहस्यमय गुंफण

‘ड्रीम मॉल’
मराठी चित्रपट

-  राज चिंचणकर
अवघ्या दोन व्यक्तिरेखांवर चित्रपट उभा करणे हे तसे धाडसाचे आणि तितकेच कठीण काम. या व्यक्तिरेखांवर सतत खिळून राहणारे लक्ष, त्यायोगे त्यांच्यावर येऊन पडणारी मोठी जबाबदारी, त्यातच रहस्याची केलेली बेमालूम पेरणी ही आणि अशी अनेक वैशिष्ट्ये मांडत ‘ड्रीम मॉल’ हा चित्रपट मनाची पकड घेतो. एका सामाजिक विषयाला स्पर्श करत केवळ स्वप्नात रमवणारा नव्हे; तर अस्वस्थ वास्तवाची रहस्यमय गुंफण करणारा हा चित्रपट आहे.
एका मॉलमधल्या आॅफिसमध्ये कामासाठी रात्री उशिरापर्यंत थांबलेल्या सई या तरुणीच्या आयुष्यात ‘ती’ रात्र काही वेगळेच घडवून आणणार आहे याची तिला कल्पना असण्याची काहीच शक्यता नाही. पण तसे घडते खरे आणि ‘ती’ रात्र तिच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरते. या मॉलचा सिक्युरिटी गार्ड हा सईवर बऱ्याच दिवसांपासून ‘वॉच’ ठेवून असतो आणि तिला हस्तगत करण्याची वाट पाहत असतो. ‘त्या’ रात्री त्याला ही संधी मिळते आणि त्याच्या विखारी नजरेची सईला जवळून ओळख पटते. त्याच्या वासनांधतेपासून सुटका करून घेणारी आणि तिचा पिच्छा न सोडण्याचा हट्ट धरलेला सिक्युरिटी गार्ड यांचा खेळ रात्रभर त्या मॉलमध्ये सुरू राहतो. थरार, रहस्य, उत्कंठा असे विभ्रम पेश करत ही गोष्ट खिळवून ठेवते.
कथालेखक व दिग्दर्शक सूरज मुळेकर याने मोठे धाडस दाखवत हा ‘ड्रीम मॉल’ साकारला आहे आणि सतत उत्कंठा वाढत राहील अशा पद्धतीने त्याने तो पडद्यावर उतरवला आहे. पुढे काय होणार, याकडे लक्ष वेधून घेत आणि त्यायोगे प्रसंगांची वीण घट्ट करत त्याने ही कथा बांधली आहे. मात्र चित्रपटाचा शेवट बेतलेला वाटतो आणि सामाजिक संदर्भ घेत शेवटी केलेली संवादबाजी टाळता येणे शक्य होते.
जो संदेश द्यायचा आहे, तो आधीच स्पष्ट होत असताना त्याचे वेगळे स्पष्टीकरण द्यायलाच हवे होते असे नाही. यात गाण्यासाठी सिच्युएशन तयार केली गेली असली, तरी या गाण्याची आवश्यकता नव्हती असेही वाटत राहते. पण एकूणच, सूरजने त्याच्याकडचे चांगले ते देण्याचा स्तुत्य प्रयत्न या चित्रपटातून केल्याचे अधोरेखित होत जाते. सिद्धार्थ जाधवचा अनोखा अंदाज आणि त्याला मिळालेली नेहा जोशीची दमदार साथ यांचा मोठा वाटा यात आहे. सिद्धार्थ जाधवला आतापर्यंत न पाहिलेल्या भूमिकेत बघायचे असेल, तर या चित्रपटाला पर्याय नाही. सिद्धार्थ हा मुळात विनोदी बाजाचा अभिनेता आहे, हे मनातून पुसले जाईल अशी कामगिरी त्याने यात केली आहे. नजरेतली वासना, खलनायकी देहबोली आणि एकूणच त्याचे अंगावर येणे त्याने ठोस साकारले आहे. नेहा जोशी ही मुळातच सशक्त अभिनेत्री, या चित्रपटात वेगळ्या ढंगात समोर आली आहे. भेदरलेली, घाबरलेली, असाहाय्य; परंतु त्याचवेळी आलेल्या प्रसंगातून सुटण्याची धडपड करणारी तरुणी तिने लाजवाब रंगवली आहे. तिने मुद्राभिनयाची कमाल केली असून, तिच्या चेहऱ्यावरची एक्स्प्रेशन्स भन्नाट आहेत. रहस्यात गुंतवत आणि अस्वस्थ करत एक सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट स्वप्नवत असे काही दाखवत नाही; तर वास्तवतेची सतत जाणीव करून देत राहतो आणि तेच त्याचे सांगणे आहे.

Web Title: The mysterious rhyme of unhealthy reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.