कस्तुरी-चकोरचे खास बाँडिंग

By Admin | Updated: December 16, 2015 01:21 IST2015-12-16T01:21:01+5:302015-12-16T01:21:01+5:30

कलर्स चॅनेलवरील मालिका ‘उडान की कस्तुरी’ला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. एवढ्या लोकप्रियतेमुळे ही मालिका शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेत कस्तुरीची

Musk-shaped special bonding | कस्तुरी-चकोरचे खास बाँडिंग

कस्तुरी-चकोरचे खास बाँडिंग

कलर्स चॅनेलवरील मालिका ‘उडान की कस्तुरी’ला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. एवढ्या लोकप्रियतेमुळे ही मालिका शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेत कस्तुरीची भूमिका सर्वात लोकप्रिय ठरली आहे. विशेषत: चकोरबरोबर कस्तुरीचे नाते प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. कस्तुरी साकारणारी अभिनेत्री सई आनंदला कस्तुरीविषयी, मालिकेविषयी काय वाटते?

या शोचा प्रस्ताव आला, त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होती?
मी माझे कुटुंब आणि मुलीच्या संगोपनात व्यस्त असल्यामुळे, चार वर्षांपासून अभिनयापासून दूरच होते. जेव्हा मला शोबद्दल विचारणा झाली, त्यावेळी मी खूप उत्साहात होते. कस्तुरीसारखी भूमिका मला करायची संधी मिळतेय, याचा मला खूप आनंद होता. या मालिकेत अभिनेत्री म्हणून काम करायला मिळाल्याने, मी स्वत:ला नशीबवान समजते. फार मोजक्या लोकांना टेलीव्हिजनवर अशा आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळतात.

कस्तुरीच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?
ज्या प्रेक्षकांनी हा शो आणि कस्तुरीच्या भूमिकेला एवढी पसंती दिली, त्या प्रेक्षकांचे आभार मानीन. मला एवढा सन्मान आणि प्रेम मिळेल याची अपेक्षा नव्हती. शो प्रेक्षकांना खूप आवडला व त्यामुळे आमचे कष्ट यशस्वी ठरले, म्हणून आम्ही खूप आनंदी आहोत. प्रवासाचे म्हणाल, तर कस्तुरीचे पात्र खूपच ताकदीचे आहे. ती निरक्षर असली तरी आपल्या अधिकाराबद्दल तिला संघर्ष करणे माहिती आहे आणि परिस्थितीला ती शरण जात नाही. या गुणांमुळेच कस्तुरीला एवढे शक्तिशाली बनविले.

चकोरबरोबर तुमची ट्युनिंग कशा प्रकारची आहे?
पडद्यावर चकोर कस्तुरीचा जीव आहे. त्याच्यासाठी कस्तुरी कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते व कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकते. आॅफ द कॅमेऱ्याचे म्हणाल, तर ती खूपच प्रेमळ मुलगी आहे. युनिटमधील सगळे तिच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही बहुतांश वेळा बरोबरच काम करतो, त्यामुळे आमचा बराच वेळ सोबतच जातो. ती खूप प्रेमळ असून आमच्यामध्ये खास बाँडिंग आहे.

अशा प्रकारच्या भूमिका तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतात?
का नाही? मीदेखील आई आहे आणि अशा प्रकारच्या भूमिकांच्या भावनांना समजू शकते. जी आई आपल्या मुलीच्या हितरक्षणासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकते, अशा भूमिकेला तर जगातील कोणतीही आई समजू शकते. शेवटी कोणतीही आई आपल्या मुलांसाठी हळवी असतेच. मी कस्तुरीच्या भूमिकेपासून स्वत:ला वेगळी मानतच नाही.

या शोमध्ये बालमजुरीचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. तुमचे याबद्दल वैयक्तिक मत काय आहे?
ज्या वयात मुलांना शिकायचे, त्या वयात त्यांना जर कुठे काम करावे लागत असेल, तर ही बाब समाज आणि देशासाठी लांछनास्पद असेल. कोणत्याही समाजात मुले शिकतील, खेळतील तेव्हाच समाज बदलेल. बालमजुरी ही देशातील एक कडवट वस्तुस्थिती आहे व त्याचे कोणी समर्थन करणार नाही. मीही करणार नाही. मी नेहमीच आयुष्यात सकारात्मक विचारांनी पुढे जात राहिले आहे.

बालमजुरीचा प्रश्न समाजातून नष्ट होईल?
का नाही होणार? मी तर सकारात्मक आहे. मी नेहमीच विचार करते की बालमजुरी नष्ट व्हायला वेळ लागेल, परंतु तेही घडेल. समाधान आहे की, सरकारही या प्रश्नाबद्दल संवेदनशील आहे व सरकार अनेक कार्यक्रमही करीत आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. त्याच्या उत्तरासाठी सामाजिक पातळीवर एकत्रित प्रयत्न करावे लागतील.

Web Title: Musk-shaped special bonding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.