‘हीरो’चा मॉडर्न अवतार
By Admin | Updated: September 11, 2015 05:24 IST2015-09-11T05:24:43+5:302015-09-11T05:24:43+5:30
सलमान खान प्रॉडक्शनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘हीरो’ चित्रपटाद्वारे दोन स्टार किड्स इंडस्ट्रीत पदार्पण करीत आहेत. हेच या चित्रपटाचे सर्वाधिक आकर्षण आहे.

‘हीरो’चा मॉडर्न अवतार
सलमान खान प्रॉडक्शनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘हीरो’ चित्रपटाद्वारे दोन स्टार किड्स इंडस्ट्रीत पदार्पण करीत आहेत. हेच या चित्रपटाचे सर्वाधिक आकर्षण आहे. ८०च्या दशकात सुभाष घर्इंनी बनविलेल्या ‘हीरो’ चित्रपटाच्या रिमेकद्वारे आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज आणि सुनील शेट्टीची मुलगी आथिया चित्रपटसृष्टीत येत आहेत. निखिल आडवाणी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘हीरो’ची जोडी सूरज आणि आथिया यांनी ‘लोकमत’ कार्यालयात संपादकीय टीमसोबत चर्चा केली.
या क्षेत्रात येण्याचा तुझा विचार कधी आणि कसा झाला?
मी असा विचारच नाही केला. लहानपणी एक गोष्ट नेहमीच सांगण्यात आली, सर्वांत प्रथम शिक्षण पूर्ण करायचे. मी कुठे न् कुठे विचार करीत असायची की, मी एक दिवस अभिनेत्री बनणार, मात्र हे मी कुणाशी बोलले नव्हते. पप्पांना तर कधीही सांगितले नाही. त्यांची मला खूप भीती वाटायची. मम्मीला याची माहिती होती. तीदेखील पहिल्यांदा अभ्यासाची गोष्ट करायची. महाविद्यालयात मी नाटकांमध्ये भाग घेण्यास प्रारंभ केला आणि कुटुंबात स्पष्ट झाले की, मी पुढे काय करणार आहे. त्या वेळेपासून मम्मी, पप्पा माझे सपोर्टिव्ह राहिले.
मूळ हीरो चित्रपट तू पहिल्यांदा कधी पाहिला?
मी खूपच लहान होते. कदाचित ७-८ वर्षांची असेन. ज्या वेळी मी हीरो चित्रपट पाहिला, त्या वेळी तो मला अधिक आवडला होता. मला माहिती नव्हते की, या चित्रपटाचे पुढे जाऊन माझ्याशी काही संबंध येईल. या चित्रपटाची कथा, संगीत, मीनाक्षी शेषाद्री यांचे नृत्य अधिक भावले होते.
राधा आणि आथिया यांच्यात कोणते साम्य जाणवतेय?
आत्मविश्वास. ही गोष्ट राधामध्येही आहे आणि माझ्यातही. राधा ही स्वतंत्र मुलगी आहे आणि मीदेखील अशीच आहे. एक गोष्ट मात्र आहे, मी सध्याच्या युगात वावरते आणि राधाचे पात्र परंपरावादी आहे.
प्रभाव पाडणाऱ्या कोणत्या अभिनेत्रीला तू या नजरेतून पाहतेस?
मी दोन अभिनेत्रींची जबरदस्त फॅन होती आणि आजही आहे. एक काजोल आणि दुसरी ऐश्वर्या रॉय बच्चन. दोघी माझ्या केवळ आवडीच्याच नाहीत तर त्यांनी ज्या पद्धतीने काम केले आहे, ते मला नेहमीच भावत आले आहे. दोघीही बेजोड कलाकार आहेत.
तुझ्या वडिलांचे चित्रपट जे तुला अधिक आवडतात?
हेराफेरी, धडकन, गोपी-किशन. मला ते कॉमेडी रोलमध्ये अधिक आवडतात.
यापैकी कोणत्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल?
नक्कीच धडकन.
तुझ्या पदार्पणातील चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. निखिलचे दिग्दर्शन, सूरजचे लाँचिंगबाबत तुला काय वाटते?
या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सलमान सर यांच्याशी यापूर्वी बऱ्याच वेळा भेटले आहे. ते घरी येत होते. हाय-हॅलो व्हायचे, मात्र असे कधी वाटले नाही की ते मला लाँच करतील. ज्या वेळी हा निर्णय झाला, त्या वेळी सलमान खान हा चित्रपट बनविणार हे ऐकून आश्चर्य वाटले होते. एक गोष्ट निश्चित होती, आमचे चित्रपटातील पदार्पण धूमधडाक्यात होईल. मी ज्याची अपेक्षा केली होती, त्यापेक्षाही हीरो
चित्रपट उत्तम झाला आहे. ज्या वेळी निखिल आडवाणी यांचा पहिला चित्रपट ‘कल हो न हो’ पाहिला, त्या वेळी मी इमोशनल झाले होते. मी त्यांची फॅन बनले होते. सूरजची गोष्ट अगदी माझ्याप्रमाणेच आहे. तोही न्यूकमर आहे. आम्हा दोघांसाठी चित्रपटाचे दरवाजे उघडत आहेत. आम्ही दोघांनी, संपूर्ण टीमने हा चित्रपट परिश्रमपूर्वक तयार केला आहे. या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढते आहे, हे पाहून आम्हाला निश्चितच आनंद होतो आहे. चित्रपटाची गाणी हिट झालीयेत. आता केवळ ११ सप्टेंबरची वाट पाहत आहोत, ज्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होईल. माझा पहिला चित्रपट प्रदर्शित व्हायला इतका कमी वेळ आहे, हा विचार करून मला थ्रिलिंग जाणवतंय.
सूरजसोबत कामाचा अनुभव कसा होता?
खूप छान. आम्ही दोघे सुरुवातीपासून या चित्रपटाच्या महत्त्वाबाबत जाणून होतो. आम्हा दोघांना अत्यंत परिश्रमपूर्वक काम करावे लागणार आहे आणि यासाठी दोघांमध्ये समजूतदारपणा आवश्यक असल्याचे माहीत होते. आता आम्ही एकमेकांचे छान मित्र झालो आहोत. तो समजूतदार आहे. परिश्रम घेताना त्याला संकोच वाटत नाही. उत्तम माणूस आहे.
सलमान खान यांच्या रागाचा कधी सामना झाला?
कधीही नाही. आम्ही त्यांच्या रागाविषयी ऐकून होतो, मात्र सामना कधी झाला नाही. ते नेहमीच प्रेमाने बोलायचे. त्यांची सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे इतके मोठे स्टार असतानादेखील स्वत:ला न्यूकमर समजतात. त्यांचा एकच संदेश होता. कधीही नर्व्हस होऊ नका. ज्या वेळी माझी गरज पडेल त्या वेळी सरळ माझ्याकडे या. ज्या वेळी आम्हाला त्यांची गरज पडली त्या वेळी आम्हाला वाट पाहावी लागली नाही आणि निराश व्हावे लागले नाही. सलमान खान यांच्याबाबत काही शब्दांत सांगणे कठीण आहे. त्यांनी आम्हाला नेहमीच संरक्षण दिले, याबाबत आम्ही नशीबवान आहोत.
सध्याच्या युगात तू कोणाला स्पर्धक मानते?
सध्या तर मी हा विचारदेखील करू शकत नाही. आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, परिणिती चोपडा या सर्व जणी उत्तम काम करून पुढे आल्या आहेत. यांना पाहून खूप समाधान वाटते.
‘हीरो’च का? या चित्रपटात असं काय आहे, ज्याच्या रिमेकमधून तुझे पदार्पण होत आहे?
हा चित्रपट मी लहानपणी अनेकवेळा पाहिला होता आणि प्रत्येकवेळी त्याचा आनंद लुटला. अर्थात हा चित्रपट पाहताना मला कधीही असे वाटले नाही की मी एक दिवस या चित्रपटाच्या रिमेकने माझ्या करिअरचा प्रारंभ करेल. ज्या वेळी या चित्रपटाचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला आणि माझी निवड झाली, तेव्हा या चित्रपटाकडे मी वेगळ्या नजरेने पाहिले. अत्यंत स्टायलिश असा हा चित्रपट होता. इतक्या मोठ्या चित्रपटाच्या रिमेकसह माझे पदार्पण होते आहे, हे माझे नशीबच. कोणाच्याही पदार्पणासाठी, कोणत्याही नवागत अभिनेत्यासाठी यापेक्षा चांगला चित्रपट असूच शकत नाही. आता तुम्हीच पाहा, काय नाही या चित्रपटात. उत्कृष्ट कथा, दोन नवीन चेहरे, नव्याने पाहण्याची दृष्टी, संगीतासह अॅक्शनदेखील. प्रदर्शनासाठी एका चित्रपटात
याशिवाय आणखी काय हवंय?
तुला असं वाटतं का जॅकीसोबत तुझी तुलना होईल?
जॅकी सरांसोबत ना तुलना होऊ शकते, ना व्हायला हवी. जॅकी श्रॉफ यांनी जे केलंय, जसं केलंय, ते तर मी विचारही करू शकत नाही. मी जॅकी सरांपेक्षा चांगले काम करुच शकत नाही. मी ही भूमिका सूरज म्हणून साकारली आहे. माझी भूमिका आणि चित्रपट याच भूमिकेतून लोक मला पाहतील अशी अपेक्षा आहे.
सुभाष घई यांचा ‘हीरो’ आणि तुझा ‘हीरो’ यात काय फरक आहे?
हे पहा, कथा तर तीच आहे. आजच्या वातावरणाच्या दृष्टीने स्क्रीनप्लेमध्ये थोडा फार फरक आहे. त्या चित्रपटात जे मुख्य पात्र होते, तेच याही चित्रपटात आहे. त्या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांचे नाव ‘जयकिशन’ होते, यात माझ्या पात्राचे नाव सूरज आहे. या चित्रपटाला निखिल आडवाणी यांनी आपल्या पद्धतीने बनविले आहे. या चित्रपटासोबत त्यांचा स्वत:चा विचार आहे. याला आपण ‘हीरो’चा मॉडर्न अवतार समजू शकता. ज्यामध्ये पुन्हा एकदा नव्या जोडीने काम केले आहे.
या चित्रपटात आथिया शेट्टीसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
ती देखील माझ्याप्रमाणेच उत्सुक आहे. आम्हा दोघांसाठी या चित्रपटाचा प्रत्येक दिवस स्पेशल राहिलाय. ती अत्यंत साधी आहे. दोस्तीने भारलेले वातावरण तयार करण्यात तिचा महत्त्वाचा वाटा आहे. तिच्यासोबत माझे काम उत्तम झाले. ती आता माझी छान मैत्रीण बनलीय.
तिचे वडील (सुनील शेट्टी) यांची मिमिक्री करून तू चेष्टा करीत असल्याचे ऐकले आहे?
हे तर गंमत म्हणून करीत होतो. यापेक्षा अधिक नाही. सुनील सर हे खूप मोठे व्यक्ती आहेत. त्यांना भेटणे नेहमीच आनंददायी राहिले आहे.
हा चित्रपट सलमान खान प्रॉडक्शन कंपनीने तयार केलाय. या चित्रपटाद्वारे पदार्पण करण्यामागे तुला कोणते कारण वाटते?
हा प्रश्न मी सलमान खान यांना अनेकवेळा विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते केवळ हसतात. मला स्वत:ला देखील माहिती नाही, की सलमान खान यांनी माझ्यासाठी हा चित्रपट का बनविला. आम्ही दोघेही नशिबवान आहोत. त्यांनी आम्हाला लाँच करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्यासाठी इतका जबरदस्त चित्रपट तयार केला.
या चित्रपटात सलमानचे किती योगदान आहे?
ते अनेक वर्षांपासून चित्रपट व्यवसायात आहेत. त्यांचे चित्रपट पाहूनच आम्ही मोठे झालो. ते माझे आदर्श आहेत. ‘हीरो’मध्ये सर्वाधिक योगदान त्यांचेच आहे. त्यांनी याचा ‘रिमेक’ करण्याचा निर्णय घेतला आणि आम्हा दोघांना संधी दिली. ते सुपरस्टार, सुपर ह्युमन बिर्इंग आणि उत्तम निर्माता आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्टीत आमची काळजी घेतली. टीप्स तर दिल्याच शिवाय कोणत्याही गोष्टीचा दबाव त्यांच्याकडून आला नाही. त्यांनी इतकंच सांगितलं की, जे करायचंय ते आपल्या पद्धतीने करा.
सलमान खान यांनी गाणंही म्हटलंय. तुला सांगितलं नव्हतं?
बरं झालं सांगितलं नाही. मी बाथरुम सिंगरपेक्षा अधिक नाही. सलमान खान यांचा आवाज जबरदस्त आहे.
या चित्रपटात तू वडील आदित्यसोबत काम केलं आहे?
पापांनी या चित्रपटात पाशा (सुभाष घई यांच्या हीरो चित्रपटातील अमरीश पुरी यांची भूमिका) साकारलीय. पहिल्याच चित्रपटात आपल्या वडिलांसोबत काम करण्याचं नशीब मला लाभलं.
तुझ्या वडिलांचा आवडणारा चित्रपट कोणता?
आतिश, याद रखेगी दुनिया आणि साथी हे वडिलांचे चित्रपट अधिक आवडतात.
तुझी आई जरीना वहाब यांच्याकडून काही टीप्स मिळाल्या का?
नाही. मम्मीला हे सर्व येत नाही. चित्रपट सुरू होण्यापूर्वी मम्मीने सांगितले होते, आत्मविश्वासाने काम कर. चित्रपटाविषयी ती फार बोलत नाही.
कलाकार म्हणून तू स्वत:ला कोणत्या भूमिकेत पाहतोस?
पहिल्यांदा हीरो आणि त्यानंतर पुढे मिळणाऱ्या चित्रपटानंतर मला कोणत्या पद्धतीच्या भूमिका मिळतील यावर सर्व काही अवलंबून आहे. जे काम येईल, ते मी करीन. माझी आवड विचाराल तर, मला म्युझिकल अॅक्शन थ्रिलरमध्ये अधिक काम करणे आवडेल.
पुढचे प्लॅनिंग आताच कसे सांगू?
अथिया म्हणाली, मी आता कुठे चित्रपट क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवते आहे. जसजसा वेळ जाईल तसतसे सर्व स्पष्ट होईल. हीरो प्रदर्शित झाल्यानंतर प्रतिसाद कसा असेल आता केवळ याच गोष्टीवर भर राहील. याशिवाय कोणत्याही गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. भविष्यात माझ्या करिअरची दिशा कशी असेल हे आताच मी सांगू शकत नाही.
पप्पांची भूमिका करणार नाही
सूरज म्हणतो, एक गोष्ट यानिमित्ताने मी स्पष्ट करू इच्छितो, मी माझ्या वडिलांच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम जरूर करेन, मात्र त्यांची भूमिका करणार नाही. मला त्यांचा आतिश चित्रपट अधिक आवडतो. ज्या वेळी या चित्रपटाचा रिमेक येईल, त्या वेळी मी नवाब (आतिशमध्ये आदित्य पांचोलीची भूमिका) करणार नाही. बाबाची (संजय दत्त) भूमिका करेन. संजय दत्त यांनी अत्यंत जबरदस्त भूमिका निभावली आहे.
- anuj.alankar@lokmat.com