भारताविरोधात बोलणं मावरा होकेनला पडलं भारी! 'सनम तेरी कसम'च्या पोस्टरवरुन हटवला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 20:16 IST2025-05-12T20:15:16+5:302025-05-12T20:16:09+5:30
मावरा होकेनने 'ऑपरेशन सिंदूर'वर केली होती टीका

भारताविरोधात बोलणं मावरा होकेनला पडलं भारी! 'सनम तेरी कसम'च्या पोस्टरवरुन हटवला फोटो
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. तसंच त्याआधीच भारताने पाकिस्तानवर अनेक कारवाया केल्या. त्यातच एक म्हणजे डिजीटल स्ट्राईक. पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स, युट्यूब यावर भारतात बंदी आली. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतावर टीका केल्याने अनेक भारतीय खवळले आहेत. 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) सिनेमात दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेननेही (Mawra Hocane) भारतावर टीका केल्याने आता या सिनेमाच्या पोस्टरवरुन तिचा फोटोच काढून टाकण्यात आला आहे.
फवाद खान, माहिरा खान, मावरा होकेन सारख्या पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम केलं आहे. 'ऑपरेशन सिंदूर'वर त्यांनी भ्याड हल्ला अशी टीका केली. यामुळे आता भारतीय त्यांना चांगलेच सुनावत आहेत. सनम तेरी कसम फेम अभिनेता हर्षवर्धन राणेने तर या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये जुनी स्टारकास्ट असल्यास काम करणार नाही अशी घोषणा केली होती. तर आता या सिनेमाच्या पोस्टवरुन मावरा होकेनचा फोटोच हटवण्यात आला आहे. भारताविरोधात बोलल्याने मावराविरोधात सर्वच भारतीय भडकले आहेत. सनम तेरी कसमच्या ऑनलाईन म्युझिक प्लॅटफॉर्मवरील पोस्टरवरुन मावराचा फोटो हटवण्यात आला आहे. हा मावराविरहीत फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दुसरीकडे अभिनेता हर्षवर्धन राणे मावराच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीला पीआर स्टंट म्हणाला आहे. तसंच सिनेमाच्या सीक्वेलमध्ये तिला घ्यायला स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचाही 'अबीर गुलाल' हा हिंदी सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र या हल्ल्यानंतर आता तो सिनेमा डबाबंद झाला आहे.