मराठीही ‘तंत्र’श्रीमंत
By Admin | Updated: April 1, 2016 02:31 IST2016-04-01T02:31:51+5:302016-04-01T02:31:51+5:30
क्लासमेट, झेंडा, बालगंधर्व, आॅनलाइन-बिनलाइन, सतरंगी रे, दुसरी गोष्ट असे चित्रपट, तर अग्निहोत्रसारख्या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसमोर स्वत:च्या अभिनयाची

मराठीही ‘तंत्र’श्रीमंत
क्लासमेट, झेंडा, बालगंधर्व, आॅनलाइन-बिनलाइन, सतरंगी रे, दुसरी गोष्ट असे चित्रपट, तर अग्निहोत्रसारख्या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसमोर स्वत:च्या अभिनयाची छाप सोडणारा सिद्धार्थ चांदेकर आज घराघरांत पोहोचला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील त्याच्या करिअरचा चढता आलेख पाहता येणाऱ्या काही कालावधीत आपल्याला सिद्धार्थच्या दर्जेदार भूमिका मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील, यात शंका नाही. नुकतेच त्याच्या ‘बसस्टॉप’ या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. ‘बसस्टॉप’च्या सेटवर ‘सीएनएक्स’ने सिद्धार्थसोबत सेलीब्रिटी रिपोर्टरच्या माध्यमातून साधलेला हा मनमोकळा संवाद...
मराठी सिनेमाला आज खूप मोठा आॅडियन्स मिळत आहे, ही खरोखरच आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. कुटुंबासहित चित्रपट पाहणारे अनेक लोक आहेत, त्याचे कारण म्हणजे आजच्या मराठी सिनेमाचा बदलता विषय. पुणे-मुंबईमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वीकेंडमध्येच त्याचे जबरदस्त कलेक्शन होते. खरे पाहायला गेले तर पुण्यात मराठी सिनेमाचा प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आहे. आज पुण्यातून मराठी सिनेमाचे जवळपास ६० टक्के कलेक्शन होते, ही खरंच मोठी गोष्ट आहे. पुण्यात मराठी सिनेमाचा रसिकवर्ग असल्याने तेथे एवढी चांगली कमाई होते. हळूहळू औरंगाबाद, नाशिक, नागपूर या ठिकाणीदेखील मराठी सिनेमाचे कलेक्शन होत आहे.
सर्वसामान्य माणूस जेव्हा त्याच्या फॅमिलीसोबत थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जातो, तेव्हा २०० ते २५० रुपयांचे तिकीट तो काढतो. एक चित्रपट पाहण्यासाठी १२००-१३०० रुपये जर प्रेक्षक घालवत असेल, तर आपलेदेखील कर्तव्य आहे, त्यांना दर्जेदार काही तरी द्यायला पाहिजे. नटसम्राट, क्सासमेट्स, लय भारी या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर पैसा कमविलाच; पण प्रेक्षकांची मनेदेखील जिंकली आहेत.
ग्रामीण भागात चित्रपट पोहोचत नाहीत, कारण तेथे थिएटर्सची कमतरता आणि त्या थिएटर्सची अस्वच्छता. त्यामुळे गावांमध्ये जे नाटकांचे स्टेज असतात, तेथे चित्रपट दाखविले जायला पाहिजे. महिलांसाठी खास शो अॅरेंज करायला हवे. थिएटर्समध्ये चांगल्या स्वच्छतागृहांची सोय असायला पाहिजे. सरकारलाच प्रत्येक गोष्टीसाठी दोष देण्यापेक्षा आपणच एकत्र येऊन काही तरी केले पाहिजे. नाटक, सिनेमा जर ग्रामीण भागात पोहोचला, थिएटर्स निर्माण झाले तर एंटरटेनमेंट इंटस्ट्रीमुळे गावातील लोकांना रोजगारदेखील उपलब्ध होऊ शकतो. केवळ आॅडियन्स अन् थिएटर्सच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात चित्रपटांचे प्रमोशन केले जात नाही. परंतु, अशा प्रकारच्या सुधारणा झाल्या तर नक्कीच गावांमध्येदेखील प्रमोशन्स करायला मजा येईल. या गोष्टींकडे लक्ष दिले तर नक्कीच सिनेमा ग्रामीण प्रेक्षकदेखील पाहतील.
मला कोणत्या प्रकारची, कशी भूमिका करायची याचा विचार मी कधीच करीत नाही. कारण, आपण विचार केलेला रोल आपल्याला मिळेल असे नाही. मी एक वेळ भूमिकेचा अभ्यास करू शकतो; परंतु ठरवून कोणता रोल करू शकत नाही. मला त्या क्षणाला जी भूमिका चांगली वाटेल, त्या भूमिकेत मला मी दिसलो की, मी लगेच तो रोल स्वीकारतो. त्यामुळे माझा कोणताही ड्रीम रोल नाही. मला चांगल्या दर्जेदार भूमिकाच नेहमी करायला आवडतात.
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्व जण
अगदी प्रोफेशनली काम करतात. आपणही कामामध्ये त्यांच्यासारखी प्रोफेशनॅलिटी शिकायला हवी. कोणी कोणाचे कितीही जवळचे मित्र असले, तरी चित्रपटामध्ये जर हे लोक एकत्र आले, तर सेटवर कोणीच कोणाचे नसते. प्रत्येक जण आपले काम किती अन् कसे चांगले होते तेच पाहत असतो. आपण आपल्या शॉटपेक्षा मित्राचा शॉट कसा झाला आहे. कोणाचा सीन किती चांगला झालाय, हेच पाहत असतो; परंतु इथे खरंच आपण स्वत:च्या कामाशी काम ठेवून स्वार्थी असणेच गरजेचे आहे.
Celebrity Reporter : siddharth chandekar
- शब्दांकन : प्रियांका लोंढे