‘गणवेश’ने वाचविली मराठी शाळा
By Admin | Updated: October 2, 2015 01:20 IST2015-10-02T01:20:59+5:302015-10-02T01:20:59+5:30
मराठी शाळांचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत असून, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मराठीची गळती प्रथम शहरातून सुरू झाली आणि आता ती खेड्यापाड्यात पोहोचली आहे.

‘गणवेश’ने वाचविली मराठी शाळा
मराठी शाळांचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत असून, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मराठीची गळती प्रथम शहरातून सुरू झाली आणि आता ती खेड्यापाड्यात पोहोचली आहे. शहरातील लोकांची नक्कल खेड्यातील मंडळी करतात हे आपण लक्षात घेतले, तर शिक्षणातील हे वारे वाहणारच की! पण, नुकतीच एका चित्रपटाने एक शाळा पडता पडता वाचवली आहे. अतुल जगदाळे यांच्या ‘गणवेश’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या तांबोळ गावी चित्रपटातील काही भाग चित्रित करण्यात आला आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, गुरू ठाकूर, सुहास पळशीकर, गणेश यादव, नागेश भोसले, शरद पोंक्षे आदी कलाकारांना या गावातील शाळेने मोहून टाकले होते. चित्रीकरणासाठी जाता - येताना त्यांना ही मोक्यावर असलेली शाळा नेहमी दिसत होती. सगळ्यांनी या शाळेत चित्रीकरण करण्याबाबत इच्छा व्यक्त केली. जगदाळेंच्या मनात ही शाळा आधीच भरली होती; पण, त्यांनी संपर्क साधला असता, ही शाळा लवकरच पाडली जाणार आहे, असे उत्तर मिळाले. सगळ्या कलाकारांच्या वतीने पुन्हा प्रयत्न करू या असे ठरले. इतक्या मोठ्या कलाकारांना पाहून व्यवस्थापन अधिकारी हडबडले आणि ‘तुमच्यासाठी काय पण’च्या भूमिकेत शिरले.
‘गणवेश’ला शाळा मिळाली. नंतर गणवेशकारांनी या शाळेचा जणू कायापालटच केला. इतकी बदललेली शाळा पाहून व्यवस्थापनाने ही शाळा न पाडता अशीच चालू ठेवण्याचे जाहीर केले.
आनंददायी बातमी कळताच निर्माते - दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी लगेच तांबोळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बबन शंकर पावशे आणि भाऊसाहेब वाकचौरे, प्रतिभा मगर, सुनीता जगताप, उषा धुमाळ, शैला अंबरे या शिक्षक मंडळीना भेटून शाळेला दोन संगणक भेट देऊन आपला आनंद साजरा केला.