सर्वांना लळा लावणारा ‘मुरली’ गेला; हळहळले ‘व्हीआयपी गाढव’चे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:58 IST2021-08-17T15:57:23+5:302021-08-17T15:58:34+5:30
VIP Gadhav : भाऊ कदम, गणेश अनासपुरे, विजय पाटकर, शीतल अहिरराव, पूजा कासेकर, शरद जाधव अशा कलाकारांसोबतच ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटातील ‘मुरली’ही फेमस झाला होता.

सर्वांना लळा लावणारा ‘मुरली’ गेला; हळहळले ‘व्हीआयपी गाढव’चे कलाकार
ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके शैली अशा तिघांचा मेळ असलेला ‘व्हीआयपी गाढव’ ( VIP Gadhav) हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर या चित्रपटातील मुरली गाढव तुम्हाला आठवतं असेलच. हाच मुरली गाढव आज आपल्यात नाही. नुकताच त्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटाचा प्रत्येक कलाकार हळहळला.
भाऊ कदम (bhau kadam), गणेश अनासपुरे, विजय पाटकर, शीतल अहिरराव, पूजा कासेकर, शरद जाधव अशा कलाकारांसोबतच ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटातील मुरली गाढवही फेमस झाले होते. पांढ-या शुभ्र रंगाच्या या मुरलीचा चित्रीकरणादरम्यान सर्वांनाच लळा लागला होता. त्यामुळेच त्याच्या निधनाची बातमी ऐकून ‘व्हीआयपी गाढव’मधील प्रत्येक कलाकार हळवा झाला.खास या चित्रपटासाठी या गाधवाची खरेदी करण्यात आली होती आणि शूटींग संपल्यावर पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे त्याची देखभाल केली जात होती. काही दिवसांपूर्वीच ते आजारी पडले आणि त्याचा मृत्यू झाला.
माझा सखा गेला...
‘व्हीआयपी गाढव’चे दिग्दर्शक संजय पाटील मुरलीच्या जाण्यावर प्रतिक्रिया देताना भावुक झाले. ‘व्हीआयपी गाढव चित्रपट परिवारातील माझा सखा मुरली गाढव, आजारपणामुळे गेला. चित्रपटाच्या निमित्ताने जगाला एक सुंदर असा मेसेज देऊन मुरली गाढवाने आपली जीवन यात्रा संपवली. माझ्या आयुष्यातील माझा सखाच आज माझ्यासोबतनाही,’ अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी दिली.