"तू अभिनेता म्हणून शून्य आहेस", आईनं थेट तोंडावर सांगितलं; अभिनय बेर्डेचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:23 IST2025-12-30T11:22:23+5:302025-12-30T11:23:42+5:30
Priya Berde And Abhinay Berde : अभिनय बेर्डे याने त्याच्या करिअरमधील संघर्षावर आणि आई प्रिया बेर्डे यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियेवर भाष्य केलं आहे.

"तू अभिनेता म्हणून शून्य आहेस", आईनं थेट तोंडावर सांगितलं; अभिनय बेर्डेचा धक्कादायक खुलासा
दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचा नुकताच 'उत्तर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. यात त्याच्यासोबत अभिनेत्री रेणुका शहाणे, हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातील अभिनयच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनयने बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या. दरम्यान एका मुलाखतीत सांगताना त्याची आई प्रिया बेर्डेच त्याच्या सर्वात मोठ्या टीकाकार असल्याचं सांगितलं.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनय बेर्डे याने त्याच्या करिअरमधील संघर्षावर आणि आई प्रिया बेर्डे यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियेवर भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, "माझी आई माझी सर्वात मोठी टीकाकार आहे. तिला माझं काम आवडलं नाही, तर ती थेट तोंडावर सांगते. ती अगदी स्पष्टपणे म्हणते की, 'तू खूप घाणेरडं काम केलं आहेस.' एकदा तर ती मला असंही म्हणाली होती की, 'तू अभिनेता म्हणून शून्य आहेस.' हे ऐकून तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं, पण आज त्याच शब्दांमुळे मी स्वतःला घडवू शकलो."
वडिलांच्या नावाचं दडपण आणि रिॲलिटी चेक
हा किस्सा लॉकडाऊनच्या आधीचा असल्याचं सांगत अभिनय पुढे म्हणाला की, "त्या काळात मी घरीच होतो आणि माझा बाहेरच्या लोकांशी फारसा संपर्क नव्हता. मला आजूबाजूच्या परिस्थितीचं भान नव्हतं. तेव्हा आईनं मला आरसा दाखवला. ती म्हणाली, 'तुला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. तुझी तुलना थेट तुझ्या वडिलांशी (लक्ष्मीकांत बेर्डे) होणार आहे. तू त्यांच्यासारखं यश मिळवशील की नाही, हा भाग वेगळा; पण तुला मिळणाऱ्या संधीचं सोनं करण्यासाठी तुला एक उत्तम अभिनेता बनावंच लागेल.'" आईनं दिलेल्या या रिॲलिटी चेकमुळे तो खचला नाही, उलट त्याने स्वतःवर अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली. आईच्या कडक स्वभावामुळेच आपल्याला सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते, असंही त्याने सांगितले.
वर्कफ्रंट
अभिनयच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, त्याने 'ती सध्या काय करते' सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं 'रंपाट', 'मन कस्तुरी रे', 'सिंगल', 'बॉईज ४', 'दशावतार', 'वडापाव' या सिनेमात काम केले.