पावसात घसरुन पडल्याने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते जखमी, 'कुटुंब कीर्रतन' नाटकाचे पुढील प्रयोग रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:09 IST2025-08-18T14:05:37+5:302025-08-18T14:09:11+5:30
वंदना गुप्तेंनी त्यांना झालेल्या दुखण्याबद्दल सोशल मीडियावर सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय

पावसात घसरुन पडल्याने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते जखमी, 'कुटुंब कीर्रतन' नाटकाचे पुढील प्रयोग रद्द
मराठी मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या पाय घसरुन पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे वंदना गुप्ते यांचं नाटक 'कुटुंब कीर्रतन'चे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. वंदना गुप्तेंनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या तब्येतीविषयी अपडेट चाहत्यांना दिली. त्यामुळे वंदना गुप्तेंच्या चाहत्यांना धक्का बसला असून चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.
वंदना गुप्ते पाय घसरुन पडल्याने जखमी
वंदना गुप्तेंनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन लिहिलं की, "हा माझा नातू. हा आता १२ वर्षांचा आहे. तो आता १३ वर्षांचा होईल. मी परवा पावसाच्या पाण्यातून पाय घसरुन पडले. माझ्या पायाला जखम झाली. अजून चालायला त्रास होतोय. त्यामुळे कुटुंब कीर्रतन नाटकाचा १८ ऑगस्ट रोजी असलेला पुण्याचा बालगंधर्वचा, १९ तारखेचा बोरीवलीचा शो कॅन्सल करावा लागतोय. ही माझ्यासाठी फार दुःखदायक वेदना जास्त आहे, जखमेपेक्षाही. पण मी सगळ्या प्रेक्षकांना सॉरी म्हणते", अशाप्रकारे वंदना गुप्तेंनी दुखापतीबद्दल त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. वंदना गुप्ते यांच्या नातवानेही त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला.
वंदना गुप्ते या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. वंदना गुप्तेंचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 'मातीच्या चुली', 'बाईपण भारी देवा', 'फॅमिली कट्टा'पासून ते नुकताच रिलीज झालेल्या 'अशी ही जमवा जमवी' सिनेमापर्यंत वंदना यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. वंदना गुप्तेंनी विविध नाटकांमधूनही कामं केली. वंदना सध्या अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्यासोबत 'कुटुंब कीर्रतन' या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करत आहेत.