जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीतील दुवा निखळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 09:45 IST2023-03-18T09:11:58+5:302023-03-18T09:45:39+5:30
ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज कोल्हापूर येथे राहत्या घरी निधन झाले.

जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीतील दुवा निखळला
ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज कोल्हापूर येथे राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सकाळी सहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपसृष्टीतील मागच्या पिढीतील अखेरचा दुवा निखळला.
मुंबईचा जावई, पिंजरा, सोंगाड्या, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसले, जावयाची जात यासह ३०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. सच्चा चित्रकर्मी, कलासंपन्न लोककला अभ्यासक, आदर्श शिक्षक अशी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, गीतकार भालचंद्र कुलकर्णी यांची चित्रपटसृष्टीमध्ये ओळख होती. अध्यापन ते कलासंपन्न कलाकार असा त्यांचा पाच तपांचा चित्रपटातला वावर होता.
देवमाणूस, मी उभा आहे. काचेचं घर, लग्नाची बेडी या नाटकांबरोबर मराठी नाटकाचा दीर्घ इतिहास सांगणाच्या संगीत सौभद्र, संशय कल्लोळ, शारदा या नाटकांची परंपरा त्यांनी जपली. चित्रपटाच्या चमचमत्या दुनियेत बन्याच कलाकारांकडून अनुभवांचे विपुल लेखन करायचे राहुन जाते. त्यांनी मात्र त्यात खंड पडू दिला नाही. मराठी चित्रसृष्टीचे किमयागार, चित्रपुरीचे मानकरी, या प्रेमाची शपथ तुला अशी त्यांची ग्रंथसंपदा संग्रही ठेवावी अशीच आहे.