"आपल्या इंडस्ट्रीत कोणाबद्दल चांगलं बोललं की जळफळाट होतो...", उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या
By कोमल खांबे | Updated: October 19, 2025 15:25 IST2025-10-19T15:24:00+5:302025-10-19T15:25:27+5:30
लोकमत फिल्मीच्या 'लाइट्स, कॅमेरा रियुनियन' या शोमध्ये माहेरची साडी सिनेमाच्या कलाकारांचं रियुनियन झालं. यावेळी उषा नाडकर्णींनीही हजेरी लावली.

"आपल्या इंडस्ट्रीत कोणाबद्दल चांगलं बोललं की जळफळाट होतो...", उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या
उषा नाडकर्णी या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. अनेक नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये त्या विविधांगी भूमिका साकारताना दिसल्या. पण, लोकांनी त्यांना खट्याळ सासूच्या भूमिकेत जास्त पसंत केलं. उषा नाडकर्णी यांचा स्वभावही एकदम बिनधास्त आहे. त्या अगदी मोकळेपणाने बोलतात आणि सल्लेही देतात. लोकमत फिल्मीच्या 'लाइट्स, कॅमेरा रियुनियन' या शोमध्ये माहेरची साडी सिनेमाच्या कलाकारांचं रियुनियन झालं. यावेळी उषा नाडकर्णींनीही हजेरी लावली.
या मुलाखतीत उषा नाडकर्णींनी माहेरची साडी सिनेमाचे किस्से शेअर केले. त्याबरोबरच त्यांनी इंडस्ट्रीची पोलखोल केली. त्या म्हणाल्या, "आता मी मुद्दामच बोलते. कारण आता माझं वय झालंय. मी कधी गचकेन माहीत नाही. म्हणून त्याच्याआधी बोलून घेते. आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाचं जर चांगलं बोललं गेलं तर तो जो काय जळफळाट होतो त्यांचा आणि माझ्याबद्दल बोलतात... पण त्या नालायक लोकांना...आता मी नालायकही बोलते का... तर मी जर वाईट असते किंवा कोणाला छळलं असतं. त्यांना एवढी अक्कल नाही का की आज ह्या बाईची पंच्याहत्तरी होऊन गेली. तेव्हा काम चालू केलेलं ती अजूनही काम करते. याचा अर्थ ती कोणालाही त्रास देत नाही".
मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्येही उषा नाडकर्णी यांनी काम केलं आहे. हिंदीतील 'पवित्र रिश्ता' ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत उषा नाडकर्णीनी साकारलेली भूमिकाही लोकप्रिय ठरली होती. वयाची पंच्याहत्तरी गाठली तरी अजूनही उषा नाडकर्णी या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.