"मी त्या डेड बॉडीजवळ गेलो आणि...", उमेश कामतने सांगितला 'ताठ कणा' सिनेमात खऱ्या मृतदेहासोबत शूटिंगचा भयावह अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:08 IST2025-11-11T15:07:35+5:302025-11-11T15:08:08+5:30
'ताठ कणा' सिनेमात उमेशने खऱ्याखुऱ्या मृतदेहासोबत एक सीन शूट केला. याचा भयावह अनुभव त्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

"मी त्या डेड बॉडीजवळ गेलो आणि...", उमेश कामतने सांगितला 'ताठ कणा' सिनेमात खऱ्या मृतदेहासोबत शूटिंगचा भयावह अनुभव
मराठी सिनेविश्वात 'ताठ कणा' या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. न्यूरोस्पाईन सर्जरीला एक नवी दिशा देऊन हजारो रुग्णांना उपचार व आपल्या मौलिक मार्गदर्शनाने 'ताठ कण्याने' जगायला शिकवणारे जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांची गोष्ट या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात उमेश कामत मुख्य भूमिकेत असून तो डॉ. प्रेमानंद रामाणी यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात उमेशने खऱ्याखुऱ्या मृतदेहासोबत एक सीन शूट केला. याचा भयावह अनुभव त्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
उमेशने सांगितलं की "गिरीश सर म्हणाले की हो...आपल्याला परमिशन मिळालीये. आधी मिळत नव्हती. त्याचे जरा प्रॉब्लेम्स होते त्यामुळे आपण तो सीन करणार नव्हतो. पण आपल्याला योग्य वेळेला परमिशन मिळालेली आहे. त्यामुळे आपण तो सीन शूट करतोय. माझ्या डोक्यात सीन तयार आहे. खराखुरा मृतदेह आहे आणि तू जाऊन तिथे फक्त मी सांगतो तेवढं कर. आपल्याला तो शॉट मिळाला तर खूप चांगलं होईल. त्यांनी हे सांगितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. हा सीन मी कसा करणार आहे? आम्ही त्या भागात जेव्हा गेलो तेव्हा तो वास मला यायला लागला आणि मी म्हटलं बापरे काही खरं नाही".
"ती डेड बॉडी कशी दिसते काही माहीत नव्हतं. पण आजूबाजूचे जे लोक रिअॅक्ट करत होते त्यावरुन मला जास्त भीती वाटत होती. त्या रुममध्ये बाकी कोणीच येणार नव्हतं मला एकट्याला जायचं होतं. त्यांनी सांगितलं तू आतमध्ये कॅमेरा बाहेर आहे. अशी ट्रॉली चालेल. अॅक्शन म्हटल्यावर अशी अॅक्शन कर तो शॉट घेतला की मी कट म्हणेन मग तू लगेच बाहेर निघून ये. मला वाटलेलं मी काही हे करू शकणार नाही. पण शेवटी धीर एकवटला. म्हटलं आपण कोणाची भूमिका करतोय मी हे जर असं तिथे जाऊन केलं तर मग सिनेमाला काहीच अर्थ नाही", असंही त्याने सांगितलं.
'ताठ कणा' या चित्रपटात उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई, संजीव जोतांगिया आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले आहेत. 'ताठ कणा' हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.