Diwali 2025: मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध कलाकार दिवाळी फराळाच्या व्यवसायातही आहेत हिट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:07 IST2025-10-16T15:07:02+5:302025-10-16T15:07:42+5:30
Marathi Celebrity Diwali Faral: दिवाळी म्हटले की, फक्त दिव्यांची रोषणाई नाही, तर खमंग फराळ कसा विसरणार. अभिनय आणि ग्लॅमरच्या दुनियेत रमणारे आपले काही लाडके मराठी कलाकार दिवाळीमध्ये थेट फराळाचा बिझनेसही करताना दिसतात आणि त्यांचे पदार्थ केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगभर पोहोचतात.

Diwali 2025: मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध कलाकार दिवाळी फराळाच्या व्यवसायातही आहेत हिट!
Marathi Celebrity Diwali Faral: दिवाळी म्हटले की, फक्त दिव्यांची रोषणाई नाही, तर खमंग फराळ कसा विसरणार. अभिनय आणि ग्लॅमरच्या दुनियेत रमणारे आपले काही लाडके मराठी कलाकार दिवाळीमध्ये थेट फराळाचा बिझनेसही करताना दिसतात आणि त्यांचे पदार्थ केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगभर पोहोचतात. कोण आहेत हे कलाकार, ज्यांची चवदार फराळाची परंपरा यंदाही रसिकांच्या जिभेचे चोचले पुरवणार आहे.
'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया नाईक हिने आपला नवा व्यवसाय 'कल्चर किचन' सुरू केला आहे. अक्षया फराळासोबतच घरी बनवलेले खास चॉकलेट्स आणि मिठाई तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनयानंतर आता तिच्या हातचे स्वादिष्ट पदार्थही चाहत्यांची मनं जिंकत आहेत.
अभिनेत्री किशोरी गोडबोलेच्या सासूबाई सुमती गोडबोले यांनी सुरू केलेला फराळ व्यवसाय आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. त्यांचे दादर येथे खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे अद्ययावत दुकान आहे. कौटुंबिक परंपरा जपणाऱ्या या फराळाची चव इतकी खास आहे की, किशोरीचे पती सचिन गोडबोले यांनी या व्यवसायाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हळूहळू गोडबोलेंच्या या फराळाची परदेशांत राहणाऱ्या भारतीयांत अशी काही ख्याती पसरली की, या फराळाची मागणी वाढली. आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे.
लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती फराळ बनवण्याचा व्यवसाय मोठ्या उत्साहाने करत आहेत. प्रार्थना बेहेरेसारख्या अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्यांच्या फराळाची चव चाखली आहे आणि त्यांचे भरभरून कौतुकही केले आहे. घरच्या घरी बनवलेल्या फराळाची ही चव चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची परंपरा चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
'काव्यांजली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी कश्मिरा कुलकर्णी अभिनयासोबतच आपल्या घरगुती स्वादिष्ट फराळानेही चाहत्यांचे मन जिंकत आहे. तिने फॅन्ससोबत फराळ शेअर करण्याची एक खास परंपरा सुरू केली आहे. ती स्वतःचा कारखाना चालवते, जिथे ती चकली, करंजी आणि अनेक चविष्ट स्नॅक्स तयार करते.
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत 'अन्नी'च्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री आणि उद्योजिका पूनम चव्हाणचा 'स्वादम' नावाचा फूड बिझनेस आहे. गाईच्या तुपापासून ते दिवाळी फराळपर्यंत, तसेच ढोकळा पीठ, केळीचे वेफर्स आणि सांबार मसाल्यासारखे विविध पदार्थ ते विकतात. त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि चवीमुळे ती बाजारात लोकप्रिय झाली आहे.