श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य, 'गोंधळ'चा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:13 IST2025-10-10T17:12:15+5:302025-10-10T17:13:08+5:30
Gondhal Movie : सध्या कांतारासोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला गोंधळ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. काही सेकंदांच्या या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून चित्रपटाची भव्यता, दमदार सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेत आहे.

श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य, 'गोंधळ'चा टीझर रिलीज
सध्या 'कांतारा'सोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला 'गोंधळ' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. काही सेकंदांच्या या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून चित्रपटाची भव्यता, दमदार सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेत आहे. कांतारा आणि दशावतार यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच गोंधळ ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात कांतारामधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात दशावतारला मोठे स्थान आहे. मात्र गोंधळ ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे.
कांतारा आणि दशावतारच्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. ‘गोंधळ’ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे. आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक सादरीकरण यांचा सुंदर संगम यात दिसत आहे. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी वेगळंच रहस्य घेऊन येते, असं टिझरमधून दिसते. काही सेकंदांची ही झलक पाहून या चित्रपटाची स्केल, टेक्निकल क्वालिटी आणि सिनेमॅटिक भव्यता स्पष्ट दिसते.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, गोंधळ हा चित्रपट महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि श्रद्धेचं दर्शन आहे. ‘कांतारा’ने जसं आपल्या लोककलेला नवा आयाम दिला, तसाच गोंधळ महाराष्ट्रातील श्रद्धा, गूढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमचं उद्दिष्ट हेच होतं की ही माती, हा रंग आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची.
डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. सहनिर्मात्या दीक्षा डावखर असून चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.