अंबरनाथ नाट्यगृहाचा पडदाच उघडला नाही! विशाखा सुभेदार यांच्या नाटकावेळी काय घडलं? नाट्यप्रेमींमध्ये संताप
By पंकज पाटील | Updated: March 29, 2026 09:51 IST2026-03-29T09:43:31+5:302026-03-29T09:51:01+5:30
अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या द दमयंती दामले नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला, त्यावेळी हा प्रकार घडला?

अंबरनाथ नाट्यगृहाचा पडदाच उघडला नाही! विशाखा सुभेदार यांच्या नाटकावेळी काय घडलं? नाट्यप्रेमींमध्ये संताप
अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या द दमयंती दामले नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. मात्र या प्रयोगावेळी मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदाच उघडत नसल्याने प्रयोग तब्बल अर्धा तास रखडला. यावेळी नाट्यगृहात कुणीही टेक्निशियन हजर नसल्याने कलाकारांनी हाताने पडदा उघडत प्रयोग सुरू केला. जाणून घ्या नेमकं काय घडलं?
संतापजनक बाब म्हणजे पडद्यात बिघाड होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या साउंड सिस्टीममध्येही बिघाड झाला. मात्र नाटकाच्या साउंड टीमने तो दुरुस्त करत नाटक पुढे सुरू केले. नाटकाचा प्रयोग संपल्यावरही अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी स्वतःच्या हाताने पडदा बंद केला. त्यामुळे इतका गाजावाजा करून सुरू झालेल्या नाट्यगृहात अंबरनाथ पालिकेला नाटकांच्या प्रयोगावेळी साधे टेक्निशियन ठेवता येत नाही का? असा संतप्त सवाल नाट्यप्रेमींनी केला.
नाटक संपल्यावर तिथे आलेल्या टेक्निशियनने पडद्यातला बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. या सगळ्या प्रकारामुळे कलाकार आणि शेकडो नाट्यरसिकांसमोर अंबरनाथ पालिकेची मात्र चांगलीच नाचक्की झाली. 'द दमयंती दामले' नाटकात विशाखा सुभेदार प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाची सध्या खूप चर्चा असून प्रेक्षक या नाटकाला हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत.