तेजस्वी पाटील आणि पद्मनाभ गायकवाड यांची मुख्य भूमिका असलेला गणू प्रदर्शित होणार या दिवशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 18:34 IST2018-12-26T18:30:29+5:302018-12-26T18:34:14+5:30
१६ वर्षांचा मुलगा आणि २५ वर्षांची मुलगी यांच्यातील किशोरवयीन प्रेम यावर आधारित या सिनेमाची कथा आहे.

तेजस्वी पाटील आणि पद्मनाभ गायकवाड यांची मुख्य भूमिका असलेला गणू प्रदर्शित होणार या दिवशी
आय. डब्ल्यू. एस. क्रिएशन निर्मित गणू हा चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १६ वर्षांचा मुलगा आणि २५ वर्षांची मुलगी यांच्यातील किशोरवयीन प्रेम यावर आधारित या सिनेमाची कथा आहे. प्रितम अभंग यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत लेखनाचीही धुरा सांभाळली आहे तर चेतन नाकटे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात ज्याने 'गणू' ची भूमिका साकारली आहे त्याचे नाव आहे पद्मनाभ गायकवाड.
किशोरवयीन प्रेम हा विषय जरी याआधी अनेक चित्रपटांमधून मांडला गेला असला तरी, वयापलीकडचं प्रेम हा या सिनेमाचा मूळ गाभा असून आतापर्यंत असा प्रयत्न मराठीत केला गेला नसल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रितम अभंग यांनी सांगितले. त्यामुळे त्या वयात मनात निर्माण होणारी प्रेमाची भावना, त्यामुळे नकळत आपल्या मनात होणारे बदल या गोष्टींवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे, त्यामुळे हे दाखवताना त्यात कोणत्याही प्रकारची अश्लीलता वाटू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले. हा चित्रपट करताना अनेक चांगले तसेच साहसी अनुभव आल्याचेही प्रितम अभंग यांनी येथे आवर्जून सांगितले.
या चित्रपटातील ‘गणू’ हे पात्र आणि ते साकारणारा पद्मनाभ हे दोन्ही एकमेकांशी खूप मिळतेजुळते असल्यामुळे पद्मनाभ हाच या भूमिकेसाठी योग्य असल्याचे प्रितम यांनी सांगितले. पद्मनाभचा मूळ प्रांत हा गायकी असल्यामुळे या भूमिकेसाठी त्याच्याकडून विशेष मेहनत करून घ्यावी लागली. पण त्यानेही हे शिवधनुष्य खूप उत्कृष्टरित्या पेलल्याचे प्रितम अभंग यांनी सांगितले.
किशोरवयीन प्रेमाची एक वेगळी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न असून प्रेक्षकांनीही ही बाजू आवर्जून पाहावी, असे आवाहन दिग्दर्शक प्रितम अभंग यांनी केले आहे. ‘गणू’ ला प्रेक्षक किती पसंत करतात हे येणाऱ्या काही दिवसांतच कळेल. पद्मनाभ सोबत या सिनेमात तेजस्वी पाटील, मोनालिसा बागल, अशोक कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत.
बॉलिवूडमध्ये आजवर हा विषय अनेक वेळा हाताळण्यात आला आहे. मराठीत देखील हा विषय तितक्याच ताकदीने प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचे चित्रपटाच्या टीमने ठरवले आहे.