सहा वर्षांनी हे त्रिकूट येणार प्रेक्षकांच्या भेटीस, फॅन्स झाले प्रचंड खूश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 18:17 IST2021-06-25T18:12:49+5:302021-06-25T18:17:29+5:30
या तिघांनी एका प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे.

सहा वर्षांनी हे त्रिकूट येणार प्रेक्षकांच्या भेटीस, फॅन्स झाले प्रचंड खूश
सहा वर्षांपूर्वी स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकर हे त्रिकूट 'तू ही रे' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलं आणि बघता बघता त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. आता हेच लाडकं त्रिकूट परत प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी एमएक्स प्लेअरच्या समांतर-२ मधून भेटीला येत आहे. समांतरच्या पहिल्या सिझनमध्ये कुमार आणि निमा महाजन म्हणजेच स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित हे गोड जोडपं आपल्यासमोर आलं होतं. मात्र आता कुमार महाजनच्या आयुष्यातील येणारी गूढ स्त्री ही सई ताम्हणकरच आहे का आणि ती आयुष्य उद्ध्वस्त करणार की सावरणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आता लवकरच संपणार आहे.
'समांतर'च्या पहिल्या सिझनमध्ये आपण पाहिलं होतं, आयुष्यात त्रस्त असलेला कुमार जोतिष्याकडे जातो आणि त्याला कळतं, त्याचं भविष्य एक व्यक्ती अगोदरच जगलेला आहे. कुमार त्या व्यक्तीच्या शोधात निघतो आणि त्याचा शोध सुदर्शन चक्रपाणीपर्यंत येऊन थांबतो. चक्रपाणी स्वतःच्या आयुष्यावर लिहलेल्या डायऱ्या कुमारला देतो. त्या डायऱ्यांमधून कुमारला कळतं की, एक गूढ स्त्री त्याच्या आयुष्यात येणार आहे. कुमारने कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी नियतीच्या या खेळात तो नकळत गुंतत जातो. पुढे काय होतं हे मात्र सिझन २ पाहिल्यावरच कळेल.
तेजस्विनी पंडित आणि स्वप्नील जोशीबद्दल सई सांगते, ''आमची मैत्री फार जुनी आहे. या दोघांबरोबर काम करायला मला नेहमीच मजा येते. आम्हा तिघांचं वेगळंच बॉण्डिंग आहे. त्यामुळे आमचं काम नेहमीच उत्तम होतं. बऱ्याच वर्षांनी एकत्र स्क्रिन शेअर करत असल्याने त्याचा एक वेगळाच आनंद आहे. 'समांतर' मधील भूमिका साकारताना आम्हा तिघांची एकमेकांच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा व्हायची. त्या एकूण चर्चेचा सकारात्मक परिणाम आपल्याला 'समांतर'मध्ये नक्कीच दिसेल. ही गूढ स्त्री नक्की कोण? नियतीच्या खेळात कुमार गुंतला जाणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर समांतरच्या दुसऱ्या सिझनमध्ये दडली आहेत.
समांतर-२' मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमध्ये १ जुलै रोजी एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे.