प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? अभिनेता सुबोध भावेने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 14:08 IST2025-07-13T14:07:49+5:302025-07-13T14:08:35+5:30
सुबोध भावेनं नुकतंच एका मुलाखतीमध्ये आज प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? याचं अगदी थेट आणि स्पष्ट उत्तर दिलं आहे.

प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? अभिनेता सुबोध भावेने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं
Subodh Bhave on Maharashtra Culture: भारतामधील अनेक राज्यांमधून दरवर्षी हजारो लोक महाराष्ट्रात येऊन स्थायिक होत आहेत. मुंबईमध्ये तर हिंदी भाषिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता आणि संवेदनशील विचारवंत म्हणून अभिनेता सुभोध भावेला ओळखलं जातं. अशातच एका मुलाखतीत "प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो?" या प्रश्नाचं अत्यंत विचारप्रवृत्त आणि भावनिक उत्तर दिलं आहे. महाराष्ट्राच्या मातीचं आणि संस्कृतीचं जे वर्णन सुबोध भावेनी केलं आहे, ते प्रत्येक मराठी मनाला अभिमान वाटायला लावणारं आहे.
सुबोध भावेनं नुकतंच सकाळशी बोलताना आज प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, "सध्याच्या काळात महाराष्ट्राला महत्व आलं आहे. कारण, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा आणि संत जनाबाई आणि संत तुकाराम महाराज या सर्व मंडळींनी महाराष्ट्रात बीज रोवली. जे प्रेमाचं होतं, जे सर्वसमावेशक वृत्तीचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील राष्ट्र उभं करताना संताच्या विचारसरणीचा फायदा झाला. संतानी हे जे बीज येथे एकमेंकाविषयी प्रेमाचं, वातसल्याचं, ममतेचं असल्यामुळे आज महाराष्ट्र हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतोय", असं सुभोध भावेनं म्हटलं.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे स्थलांतरामुळे मुंबईतील हिंदी भाषिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात काही हिंदी भाषिक मुंबईत मराठीला विरोध करत हिंदीचा हट्ट धरताना दिसून येत आहेत. जे लोक महाराष्ट्रात मराठी बोलत नव्हते, त्यांना मारहाण करण्यात आली. अशा परिस्थितीत आता अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशावेळी मराठी भाषेचं अस्तित्व जपण्याची गरज अधिक तीव्रतेने असल्याचं म्हटलं आहे.