"मुळी न वाटे लाज तयांना..." हिंदी सक्तीच्या वादावर स्पृहा जोशीची कविता, म्हणाली "जीआर रद्द झाला पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:05 IST2025-07-01T11:05:35+5:302025-07-01T11:05:50+5:30
हिंदी सक्तीचा जीआर रद्द करताच मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने कविता शेअर केली आहे.

"मुळी न वाटे लाज तयांना..." हिंदी सक्तीच्या वादावर स्पृहा जोशीची कविता, म्हणाली "जीआर रद्द झाला पण..."
Spruha Joshi On Hindi Language Compaltion: राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन मोठा वाद पेटला होता. राजकीय नेत्यांपासून ते साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कलावंतांपर्यंत अनेकांनी हिंदी सक्तीला विरोध केला होता. अखेर अशातच आता हिंदी सक्तीचा जीआर राज्य शासनाच्या वतीनं मागे घेण्यात आला आहे. रविवारी (२९ जून) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीआर मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. यासोबतच सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली. या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र या लागू केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यानंतर आता हिंदी सक्तीचा जीआर रद्द होताच मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीनं (Spruha Joshi) कविता शेअर केली आहे. स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच कवयित्रीसुद्धा आहे.
स्पृहा जोशी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. त्याद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच अभिनेत्रीने खास कवितेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 'मायबोली' असं तिच्या कवितेचं शिर्षक आहे. भाषेच्या मुळावर घाला घालणाऱ्या धोरणांचा निषेध करत, जनजागृती आणि भाषाभिमानाचा जागर करण्याचा स्पृहानं प्रयत्न आहे. एक काळ असा होता, जेव्हा ज्ञानेश्वरीच्या ओव्यांतून, तुकारामांच्या अभंगांतून आणि संतांच्या वाणीतून मराठी भाषेचं तेज झळकत होतं. पण आज तीच मायबोली आपल्या मातीतच उपेक्षित झाली आहे, याच वेदनांना कवितेच्या माध्यमातून तिनं केल्यात. स्पृहाची ही कविता अनेकांना विचार करायला लावणारी आहे. यातेवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्पृहा जोशीची कविता...
जीआर रद्द झाला खरा.. पण!!!
ज्ञानोबांची अमृतबोली
ज्ञानाची रसगंगा
मायबोलिच्या उरे अंगणी
आता केवळ दंगापरंपरेतुन अभंग झाली
अमुची मायमराठी
अभिजात तिचे सौंदर्य देखणे,
कायम अमुच्या पाठी..परंतु चाले खेळ अनोखा
महाराष्ट्र देशा
अपुल्या डोळ्यासमोर हरवे
आपुलीच हो भाषा.सत्ताधारी कुणी विरोधी
मोठी राजघराणी
हताश होऊन बघे मराठी
उदास केविलवाणी !मंत्रालय वा हो न्यायालय
दबकत पाउल टाकी..
अधिक- उणे च्या गणितामध्ये
उरली केवळ ‘बाकी!’श्रेय लाटुनी मराठिचे
वर उद्धाराच्या बाता
मुळी न वाटे लाज तयांना
नक्राश्रू ढाळता..राजनीतिच्या पटावरूनी
हलती प्यादी सारी,
उगा उमाळे, कढ हे खोटे
बोलायाची चोरी!दुस्वासा कुठल्या भाषेच्या
मुळी नसावा थारा
सक्तीने पण होऊन जातो
जीव उगाच बिचारा !कोणासाठी कोणा कारण
हा कट रचला जातो..
एकशे पाच हुतात्म्यांचा
श्वास पुन्हा गुदमरतो..मायबोलिच्या पुनरुथ्थाना
असेच काही व्हावे
ज्ञानोबांनी सदेह आता
मराठदेशी यावे!!- स्पृहा
स्पृहा जोशी ही एकटीच नव्हे तर या हिंदी सक्तीच्या विरोधात कवी, लेखक, दिग्दर्शक आणि मराठी कलाकारही मैदानात उतरले होते. हेमंत ढोमे, किरण माने, वैभव मांगले, सचिन गोस्वामी, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, केदार शिंदे तसंच रवी जाधव या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हिंदी सक्तीला विरोध केला होता.