मी नाट्यगृह बोलतोय!! जुन्या यंत्रणा करतात बेरंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 11:20 AM2022-05-10T11:20:12+5:302022-05-10T11:21:02+5:30

Me natyagruha boltoy part 2: ...तर आदर्शवत ठरू शकेल प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह

special article me natyagruha boltoy part 2 Prabodhankar Thackeray Natyagruha | मी नाट्यगृह बोलतोय!! जुन्या यंत्रणा करतात बेरंग

मी नाट्यगृह बोलतोय!! जुन्या यंत्रणा करतात बेरंग

googlenewsNext

संजय घावरे
 

मी नाट्यगृह बोलतोय (भाग - 2)

मुंबई : पश्चिम उपनगरातील सोयीसुविधांनी सज्ज असलेले नाट्यगृह अशी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाची ख्याती आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या या नाट्यगृहाबाबत फार तक्रारी नाहीत, पण ज्या काही थोड्या तक्रारी आहेत त्या दूर केल्या तर हे नाट्यगृह इतर नाट्यगृहांसाठी आदर्शवत ठरू शकेल. नाटयगृहाची इमारत २२ वर्षे जुनी असली तरी योग्य ती देखभाल आणि वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आल्याने इथे रंगकर्मींना फार समस्यांना सामोरे जावे लागत नाही. साऊंड सिस्टीम जुनी झाली आहे. त्यामुळे मागच्या रांगांमध्ये बसणाऱ्या रसिकांपर्यंत कलाकारांचा आवाज नीट पोहोचत नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात.

बराच पाठपुरावा करूनही अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अद्ययावत साऊंड सिस्टीम बसवण्याची मागणी रंगकर्मींकडून सातत्याने होत आहे. यासोबतच कलाकार कपडे बदलतात तिथे आणखी चांगली सोय होणे गरजेचे आहे. गाडी पार्क करण्याचा मुद्दा कलाकारांसाठी काही अंशी त्रासदायक ठरत आहे. नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना सध्या मोफत पार्किंग आहे, पण भविष्यात कंत्राटदार कलाकारांकडूनही पैसे मागू शकतो अशी भीती रंगकर्मींना वाटते. नाटकाचा प्रयोग करणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक आणि कलाकारांसह तत्रज्ञांच्या गाड्यांसाठी कायमस्वरूपी विनामूल्य पार्किंग करण्यात यावे, अशी रंगकर्मींची मागणी आहे.

या नाट्यगृहाची जमेची बाजू म्हणजे तत्कालीन नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर आणि प्रदीप कबरे यांच्या प्रयत्नांमुळे इथल्या लघुनाट्यगृहांमध्ये प्रायोगिक नाटकांसाठी भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या नाट्यगृहामध्ये चार रिहर्सल हॅाल्स आहेत. यामुळे उपनगरातील रंगकर्मींच्या नाटकाची तालिम करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. इथले मेकअप रुम्स, खुर्च्या, वातानुकूलित यंत्रणा, व्हिआयपी रुम्स, टॅायलेट्स चांगल्या स्थितीत असून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते.

  • इतिहास व माहिती :

मार्च २००० मध्ये या नाट्यगृहाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. २२ वर्षांपासून हे नाट्यगृह अविरतपणे रसिकांचे मनोरंजन करत आहे. बोरिवली आणि आसपासच्या भागांतील सांस्कृतिक चळवळीत मोलाचे योगदान देत आहे. आज हे नाटयगृह उपनगरांतील रंगकर्मींचे हक्काचे स्थान बनले आहे. त्यामुळेच उपनगरामध्ये जास्तीत जास्त नाटके या नाट्यगृहात होतात. मराठी नाटकांच्या जोडीला इथे गुजराती नाटकेही होतात. २०० आसनक्षमता असलेले इथले लघुनाट्यगृह प्रायोगिक नाटकांसाठी खूप उपयुक्त आहे.

...तो आवाज आजही कानात घुमतोय - प्रदीप कबरे (अभिनेते-दिग्दर्शक)

बोरिवलीमध्ये नाट्यगृह व्हावे ही उपनगरवासीयांची मागणी इतर नाट्यगृहांच्या तुलनेत लवकर पूर्ण झाली. प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह महानगरपालिकेचे असूनही इथे डिपॉझिट तसेच भाड्यासाठी डीडी किंवा कॅशची मागणी केली जात नाही. चेक स्वीकारला जातो ही खूपच दिलासादायक बाब आहे. ध्वनी यंत्रणेचा मुद्दा वगळता इथे फार समस्या नाहीत. चारही रिहर्सल हॅाल वातानुकूलित आहेत. त्यामुळे प्रबोधनकारमध्ये नाटक किंवा तालिमी करताना एक वेगळीच एनर्जी येते. या नाट्यगृहाशी निगडीत काही आठवणी आहेत. 'हँड्सअप' नाटकाच्या वेळी माझ्या एंट्रीनंतर रसिकांनी जवळपास अडीच-तीन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला होता, जो आजही माझ्या कानात घुमतोय.

इथं एक वेगळीच ऊर्जा संचारते - अंशुमन विचारे (अभिनेता)

इतर नाट्यगृहांच्या तुलनेत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात फार समस्यांना सामोरं जावं लागत नाही ही सर्वच रंगकर्मींना दिलासा देणारी बाब आहे. इथं परफॅार्म करताना एक वेगळीच उर्जा संचारते आणि प्रयोग खूप छान रंगतो. इथला कर्मचारी वर्गही सर्वांशी आपुलकीने वागतो. मेकअपरुम्सपासून स्वच्छमागृहांपर्यंत सर्वच टापटीप असल्यानं इथं आल्यावर मन प्रसन्न होतं. साऊंड सिस्टीमचा मुद्दा खूप महत्त्वाचा असला तरी व्यवस्थापनानं मनात आणलं तर तो प्रश्न चुटकीसरशी सुटू शकेल. सध्या तरी पार्किंग मोफत असल्यानं तो मुद्दाही तसा गौणच आहे.

Web Title: special article me natyagruha boltoy part 2 Prabodhankar Thackeray Natyagruha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.