"इतकी वर्ष मी पाहिलेला अतुल अन् आज...", सोनिया परचुरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:22 IST2025-10-16T14:21:18+5:302025-10-16T14:22:23+5:30
Sonia Parchure Atul Parchure: अतुल परचुरेंच्या प्रथम स्मृतिदिनी काल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

"इतकी वर्ष मी पाहिलेला अतुल अन् आज...", सोनिया परचुरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं गेल्यावर्षी निधन झालं. सगळ्यांना खळखळून हसवणारे शेवटी रडवून गेले. अतुल परचुरे यांना आधी कॅन्सर होता. त्यातून ते बरेही झाले होते. नाटकाचे दौरेही केले. मात्र आजाराने पुन्हा डोकं वर काढलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतुल परचुरेंची पत्नी सोनिया परचुरे यांनी पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या तेव्हा सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले.
सोनिया परचुरे म्हणाल्या, "माझं अतुलमुळेच रंगमंचाशी नातं जुळलं. त्यामुळे अतुल नसताना मला कोणत्या थिएटरमध्येही अजून जाता येत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही एवढे सगळे आज आलात मला खूप चांगलं वाटतंय. ३० वर्षात मी अतुलला जे बघितलं तो अतुल आणि तो नसताना आज मी ज्या अतुलला बघतेय तो वेगळाच आहे. त्याच्याविषयी सगळेजण इतकं बोलत आहेत. अतुलचं मित्रप्रेमही खूप होतं. शेवटच्या चार पाच वर्षात मी अतुलबरोबर एकही सिनेमा पाहिला नाही. कारण सगळे सिनेमे त्याने विनय केंकरेंबरोबर पाहिले असायचे. विजय, सुनील, संजय आज तुम्ही इथे आलात, भरभरुन बोललात खरोखरंच त्यासाठी धाडस लागतं."
त्या पुढे म्हणाल्या, "अतुल जेव्हा रुग्णालयात होता तेव्हा सतत म्हणायचा की सुनीलला सांगितलं आहेस ना की नाटक...शेवटपर्यंत त्याच्या डोक्यात नाटकाचेच विचार होते. मला फार बोलता येत नाहीये.. मी आज सगळ्यांचेच आभार मानते."
अतुल परचुरे आणि सोनिया यांना सखील ही मुलगी आहे. सोनिया परचुरे या भरतनाट्यम नृत्यात पारंगत आहेत. त्या नृत्यदिग्दर्शिका आणि नाट्यअभिनेत्री आहेत. तर सखील परचुरे ही फॅशन स्टायलिस्ट आहे.