"तू आता वयाने मोठी दिसतेस..." असं सांगतं सोनाली कुलकर्णीला हिंदी प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 14:02 IST2026-03-01T13:26:48+5:302026-03-01T14:02:14+5:30
"मला माझं वय स्वीकारायचं आहे" सोनाली कुलकर्णीने स्पष्टच सांगितलं; कॉस्मेटिक सर्जरीच्या सापळ्यात अडकण्यास दिला नकार

"तू आता वयाने मोठी दिसतेस..." असं सांगतं सोनाली कुलकर्णीला हिंदी प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, अभिनेत्री म्हणाली...
मनोरंजन क्षेत्रात रंग, दिसणं आणि वय यावरून कलाकारांना काम नाकारलं जाण्याचे अनुभव नवे नाहीत. असाच एक धक्कादयाक अनुभव मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिला आला आहे. एका मोठ्या हिंदी ओटीटी (OTT) शोसाठी निवड झाली असतानाही, केवळ "वयाने मोठी दिसतेस" असे सांगून तिला या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने याचा खुलासा केला. ती म्हणाली, "मी एक हिंदी ओटीटी शो साईन केला होता. लेखकांपासून दिग्दर्शकांपर्यंत सर्वांना मी भेटले होते. भूमिकेची गरज आणि वयोगट माझ्याशी जुळणाराच होता. दोन तास क्रिएटिव्ह चर्चा झाली, फी आणि तारखाही ठरल्या. मी स्क्रिप्टवर अभ्यासही सुरू केला होता. मात्र, अचानक मला निरोप आला की निर्माते आता माझ्या जागी दुसऱ्या एका 'लोकप्रिय' हिंदी अभिनेत्रीचा विचार करत आहेत". याचे कारण विचारले असता तिला सांगण्यात आले की, "सोशल मीडिया फॉलोअर्स आणि लोकप्रियता या गोष्टींशिवाय तू आता वयाने मोठी दिसत आहेस".
धक्कादायक गोष्ट म्हणजे, हा निष्कर्ष काढण्यासाठी निर्मात्यांनी तिची कोणतीही लुक टेस्ट घेतली नाही. त्यांनी फक्त तिच्या आगामी 'तिघी' सिनेमाचा टीझर पाहिला. या सिनेमात सोनालीने भूमिकेची गरज म्हणून कोणताही मेकअप न वापरता, चेहऱ्यावरील नैसर्गिक रेषा न लपवता काम केलं आहे. एका अभिनेत्रीने आपल्या कलेसाठी प्रामाणिक राहून केलेला हा प्रयोग, तिचं काम हिरावून घेण्यास कारणीभूत ठरला.
सोनालीला अनेक ओळखीच्या लोकांनी चेहऱ्यावर 'फिलर्स' किंवा कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला. आजच्या काळात अनेक अभिनेत्री तरुण दिसण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. मात्र, सोनालीने या दबावाला बळी न पडण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, "त्याने मला काम मिळणार आहे का? कदाचित मिळेलही. मग मी विचार केला की, मला यात कृत्रिम पद्धतीच्या सौंदर्यात अडकायचं आहे का? फिलर्स केलं तर मला ते सतत करावं लागेल आणि मी यात अडकले तर सगळं भीषण होत जाणार. त्यापेक्षा मला माझं वय स्वीकारायचं आहे. बाकीचे सगळे करतायत आणि आपणसुद्धा त्यातले भाग आहोत, तर मलाही ते करायचं आहे हा दबाव नको. सगळे करतायत म्हणून मी नाही करणार. मला ते पटतंय का? प्रत्येकाचा स्वत:चा विचार आहे. ज्यांना ते पटतं त्यांनी ते करावं. तुमचं शरीर आहे, तर निर्णयही तुमचाच असायला हवा".