एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:08 IST2025-09-24T11:07:40+5:302025-09-24T11:08:15+5:30
इंडस्ट्रीतील लोकांचा एकमेकांशी समन्वयच नाही?

एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
गेल्या काही दिवसात अनेक मराठी सिनेमे रिलीज झाले. १२ सप्टेंबर रोजी 'दशावतार', 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' हे तीनही सिनेमे प्रदर्शित झाले. पुढच्याच आठवड्यात 'कुर्ला टू वेंगुर्ला', 'आतली बातमी फुटली', 'साबर बोंडं', 'अरण्य' हे चित्रपट आले. आधीच मराठी सिनेमांना प्रेक्षक येत नाही ही ओरड असते त्यात जर एकाच वेळी इतके मराठी सिनेमे प्रदर्शित झाले तर लोक कुठे कुठे येणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरुन इंडस्ट्रीतील लोकांचा एकमेकांशी काहीच समन्वय नसल्याचंही दिसून आलं आहे. गायक मंगेश बोरगांवकरने यावर भाष्य केलं आहे.
मंगेश बोरगांवकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "नुकताच आरपार सिनेमा पाहून आलो. एकाच वीकेंडला जवळपास चार ते पाच मराठी सिनेमे रिलीज झालेत . कसं होणार? आधीच एवढी वाईट अवस्था त्यात इंडस्ट्रीचा एकमेकांशी समन्वय नाही. असे चित्रपट आल्यास साहजिक कोणालाही नीट वेळ मिळणार नाही. कारण आपल्याकडे बॉलिवूड, साउथ या इंडस्ट्रीही चालतात. अशा परिस्थितीत एकाच वेळी पाच सहा सिनेमे रिलीज करता तेव्हा लोक कसे येणार? सगळेच चित्रपट प्रेक्षक बघतील एवढी क्षमताही आपल्याकडे नाही. जरा एकमेकांमध्ये समन्वय साधला तर सगळ्यांना स्कोप मिळेल. सामान्य प्रेक्षकांनाही ही गोष्ट लक्षात येत आहे मग इंडस्ट्रीतील लोकांना कोण सांगणार."
रिलीज झालेल्या सिनेमांपैकी 'दशावतार' सिनेमा जोरात सुरु आहे. सिनेमाने जवळपास २० कोटी कमावले आहेत. तर आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट नाही १ कोटींचा टप्पा गाठला आहे. अशा परिस्थितीत नव्याने आलेल्या सिनेमांचं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.