"भावा... हे तुझ्यासाठी!" पुरुषांसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास कविता, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:28 IST2025-11-20T10:26:01+5:302025-11-20T10:28:17+5:30
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने पुरुषांच्या भावनांना आणि त्यांच्या रोजच्या संघर्षाला वाट मोकळी दिली.

"भावा... हे तुझ्यासाठी!" पुरुषांसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास कविता, म्हणाला...
दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' (International Men's Day) साजरा केला जातो. या खास दिवसाचं निमित्त साधून मराठीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने पुरुषांच्या भावनांना आणि त्यांच्या रोजच्या संघर्षाला वाट मोकळी दिली. अभिनेत्यानं एक खूपच सुंदर आणि भावनिक कविता सादर केली आहे. पुरुषांच्या खांद्यावर असलेले ओझे, त्यांनी दाबून ठेवलेल्या भावना आणि त्यांच्या अपेक्षांबद्दल बोलणारी ही कविता सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ चांदेकर याने या खास कवितेत प्रत्येक पुरुषाच्या भावना, त्यांची जबाबदारी आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज यावर भाष्य केले आहे. या कवितेतील काही ओळी थेट काळजाला भिडणाऱ्या आहेत.
सिद्धार्थ चांदेकरची कविता…
भावा... तुझी ओझी उचलताना कधी तुझा खांदा दुखावला आणि वाटलं भिरकावून द्यावं सगळं तरीही चालेल...
मनात साठवलेलं सगळं अलमारीत भरता-भरता एखादा हुंदका खाली पडला तरीही चालेल...
केवढी धाप लागली, घोटभर पाणी तरी पी…
उसन भरेल आता, जरा ती पाठ टेकव की
अरे होणारे सर्व हवं तसं जरा श्वास घे बरं
उरलेली गणितं उद्या कर... आता जरा डोळे मीट बरं
मी आहे हे दाखवून द्यायला गावभर फेऱ्या मारणार आणि मी नसलो तर यांचं काय होईल…हा विचार रात्रभर करणार
घेतोसच आहे की सगळ्यांची काळजी, थोडं स्वत:कडे लक्ष दे... सगळ्यांचे हट्ट पुरवून झाले असतील तर स्वत:साठीही काहीतरी घे
उशीमध्ये तोंड खुपसून जोरात ओरडावंसं वाटलं, तरीही चालेल...तिच्या कुशीत शिरुन धाय मोकलून रडावंसं वाटलं, तरीही चालेल...
सकाळी फक्त तुझ्या पायातली ती ताकद परत आण
अजून खूप लांब जायचंय तुला
तू महत्त्वाचा आहेस आणि तू हे करू शकतोस, हे त्या आरशातल्या चेहऱ्याला सांगायचंय तुला... Happy Men’s Day
सिद्धार्थची ही कविता वाचून अनेक जण भावुक झाले. अभिनेत्याच्या मित्र-परिवाराने आणि चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केलाय. "पुरुषानेचं पुरुषांना दिलेल्या मोलाच्या शुभेच्छा!", "कमाल आहे सिद्धू दादा", "रडवल रे मित्रा!" अशा कमेंट केल्या आहेत.