"माझ्या अशुआईचा…", अश्विनी एकबोटेंच्या वाढदिवशी लेकाची भावुक पोस्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:48 IST2026-03-22T15:46:01+5:302026-03-22T15:48:04+5:30

अश्विनी एकबोटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा लेक शुभंकर एकबोटेने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.

Shubhankar Ekbote Emotional Post On Mother Ashwini Ekbote's Birthday | "माझ्या अशुआईचा…", अश्विनी एकबोटेंच्या वाढदिवशी लेकाची भावुक पोस्ट, म्हणाला...

"माझ्या अशुआईचा…", अश्विनी एकबोटेंच्या वाढदिवशी लेकाची भावुक पोस्ट, म्हणाला...

नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या भरतनाट्यम् नृत्यांगणा अश्विनी एकबोटे यांचं व२२ ऑक्टोबर २०१६ रोजी रंगमंचावरच निधन झालं. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असतानाच, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ४४ वर्षांच्या होत्या. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी मात्र अविस्मरणीय राहणार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अश्विनी एकबोटे यांचा लेक शुभंकर एकबोटेने  सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.

शुभंकर एकबोटेनं आपली आई अश्विनी एकबोटे यांच्यासोबतचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यानं लिहलं, "आज २२ मार्च २०२६ रोजी, माझ्या अशुआईचा ५४ वा वाढदिवस...वाढदिवसाच्या भरभरून कडकडीत शुभेच्छा अशुआई! आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझी २ लेकरं मी आणि अमृता तुला आवडणाऱ्या काही मोजक्या नाट्यगृहांपैकी एक असलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले इथे आपल्या नवीन नाटकाचा प्रयोग सादर करतोय, आम्हा दोघांकडून तुझ्यासाठी वाढदिवसाची यापेक्षा अजून भारी भेट असूच शकत नाही. आजचा प्रयोग तर भारीच करू आम्ही.. आमचं १०००००% देऊन करूच पण आयुष्यातला प्रत्येक प्रयोग जीव लावून सगळं पणाला लावून करू आशुआई".

 पुढे त्यानं लिहलं, "मी कायम स्वामींकडे निसर्गाकडे आणि कामाच्या प्रत्येक माध्यमाकडे मनापासून हीच प्रार्थना करतो की माझ्या अशुआईने ज्या हिमतीने, जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आणि एकाग्रतेने काम केलं, मग ते नृत्य असो किंवा अभिनय त्याच्या १% तरी मला माझ्या आयुष्यात जमुदे. मला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे की तू होतीसच, आहेसच आणि कायम असशीलच आमच्या बरोबर. तुझी साथ, आशीर्वाद , प्रेम आणि शुभेच्छा आहेत, म्हणूनच आम्हाला इतक्या छान नाटकातून सुमीत दादा-चिन्मयी मावशी या दिग्गज लोकांबरोबर रंगभूमीवर काम करायची संधी मिळतीये". 


"माझ्या प्रत्येक प्रयोगाचं तुझं पहिल्या रांगेतील एकदम मध्यभागीचं सीट कायम तसंच होतं आणि तसंच असेल. बघत राहा मला. आई नाहीतर मी सुटेन कदाचित प्रेमात पडेन स्वतःच्या, बघत रहा कायम आणि छडी देत जा... योग्य वेळी २ धपाटे देत जा... तुझ्या नेहमीच्या स्टाईलने मला धडा शिकवत जा... काय बरोबर काय चुकीचं सांगत जा... माझी अशुआई माझी सगळ्यात पहिली मैत्रीण आणि मित्रही, माझी सखी, आज तुझ्या ५४वा वाढदिवसानिमित्त जेव्हा तू अजूनच तरुण झाली आहेस. आपण आपली ही दोस्ती साजरी करू आणि 'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणत नाचू गाऊ जल्लोष करू", या शब्दात शुभंकरनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title : अश्विनी एकबोटे के जन्मदिन पर बेटे का भावुक पोस्ट।

Web Summary : अश्विनी एकबोटे के जन्मदिन पर, उनके बेटे शुभंकर ने पुरानी तस्वीरों के साथ एक भावुक सोशल मीडिया पोस्ट साझा किया। उन्होंने अपने जीवन और करियर पर उनके प्रभाव को याद करते हुए गहरा प्यार और आभार व्यक्त किया।

Web Title : Ashwini Ekbote's son's emotional post on her birthday.

Web Summary : On Ashwini Ekbote's birthday, her son, Shubhankar, shared a heartfelt social media post with old photos. He expressed deep love and gratitude, remembering her influence on his life and career.