Shivani Surve : 'वाळवी' फेम शिवानी सुर्वेचे आगामी मराठी चित्रपट कोणते ? चाहत्यांमध्ये उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:28 IST2023-01-22T14:28:02+5:302023-01-22T14:28:53+5:30
'वाळवी' नंतर शिवानी आणखी कोणत्या चित्रपटात दिसणार याची उत्सुकता अनेकांना आहे.

Shivani Surve : 'वाळवी' फेम शिवानी सुर्वेचे आगामी मराठी चित्रपट कोणते ? चाहत्यांमध्ये उत्सुकता
Shivani Surve : बिग बॉस मराठी २ (Bigg Boss Marathi 2) मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी यंदाचं वर्ष खूपच खास दिसतंय. नुकताच तिचा 'वाळवी' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत. शिवानीला पहिल्यांदाच स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अनिता दाते (Anita Date) यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने ती भलतीच खूश आहे. यातील शिवानीच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. आता वाळवी नंतर शिवानी आणखी कोणत्या चित्रपटात दिसणार याची उत्सुकता अनेकांना आहे.
शिवानीने आधी हिंदी मालिकांमध्ये बऱ्याच काळ काम केलं. तेव्हा ती मराठी मनोरंजनसृष्टीशी जोडली गेलेली नव्हती. नंतर तिने बिग बॉस मराठी २ मध्ये सहभाग घेतला ज्यामुळे शिवानी हा मराठी चेहरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षी तिने अंकुश चौधरीसोबत 'ट्रिपल सीट' हा सिनेमा केला. तर आता वाळवी या सिनेमामुळेही तिचं खूप कौतुक होतंय. नुकतंच शिवानीने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे.
शिवानी म्हणाली, '२०२२ या वर्षात खूप काम केलं. आता तेच काम यावर्षी तुमच्यासमोर येणार आहे. दोन तीन सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हे नवीन वर्ष माझ्यासाठी बऱ्याच संधी देणारं वर्ष आहे असं मला वाटतं. आगामी प्रत्येक सिनेमात मी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत याचा मला आनंद आहे. वाळवी ला मिळणारा प्रतिसाद बघून खूप आनंद होत आहे. याशिवाय 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' ही पॅनइंडिया मराठी फिल्म प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मी नक्षलवाद्याची भूमिका साकारली आहे. यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, फिजीकल ट्रेनिंगही घेतलं आहे. माझ्या कंफर्टझोनच्या बाहेर जाऊन मी यात काम केलंय.'
शिवानी पुढे म्हणाली, 'महेश मांजरेकर सरांच्या 'वीर दौडले सात' या सिनेमातही मी भूमिका करत आहे. ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. महेश मांजरेकर सरांच्या एवढ्या महत्वपूर्ण प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळणार असल्याने मी खूश आहे. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. याशिवायही माझे आणखी दोन सिनेमे रिलीज होणार आहेत त्याबद्दल लवकरच समजेल.'
तर शिवानीला आणखी मराठी सिनेमांमध्ये पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार आहे. तसेच शिवानीलाही अनेक विविधांगी भूमिका साकारायची संधी मिळत आहे.