'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्याला सिनेमाची लॉटरी! ट्रेनमध्ये लागले चित्रपटाचे पोस्टर, म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:57 IST2025-11-12T11:56:42+5:302025-11-12T11:57:24+5:30
अभिनेता निशाद भोईर 'गोंधळ' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्याला सिनेमाची लॉटरी! ट्रेनमध्ये लागले चित्रपटाचे पोस्टर, म्हणतो...
'गोंधळ' या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या आगामी सिनेमात मराठी मालिकेत काम करणाऱ्या एका टीव्ही अभिनेत्याची लॉटरी लागली आहे. अभिनेता निशाद भोईर 'गोंधळ' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
'गोंधळ' सिनेमाचे पोस्टर लोकल ट्रेनमध्येही झळकले आहेत. निशादची व्यक्तिरेखा असलेलं पोस्टर ट्रेनमध्ये पाहून अभिनेता थक्क झाला आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. "करिअरसाठी एक छोटी स्टेप आहे. पण एका स्वप्न पाहणाऱ्या मुलासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्या पहिल्या सिनेमाचं पोस्टर. या संधीबद्दल धन्यवाद", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. निशादने 'सावळ्याची जणू सावली', 'निवेदिता माझी ताई', 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई', 'दख्खनचा राजा जोतिबा', 'आई - मायेचं कवच' या मालिकांमध्ये काम केलं आहे.
'गोंधळ' म्हणजे आपल्या मातीतली आणि संस्कृतीतली कहाणी आहे. आत्मा, लोककलेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम यात प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘गोंधळ’ हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.