'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं सई ताम्हणकरनं केलं कौतुक, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 02:33 PM2024-04-19T14:33:41+5:302024-04-19T14:38:46+5:30

सई ताम्हणकरने खास पोस्ट शेअर केली आहे.

Sai Tamhankar praised Maharashtrachi Hasya Jatra Fame Priyadarshini For Winning First Filmfare | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं सई ताम्हणकरनं केलं कौतुक, कारण काय?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं सई ताम्हणकरनं केलं कौतुक, कारण काय?

मराठी कलाविश्वात मानाचा समजला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे हा फिल्मफेअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात दिली जाणारी पुरस्कार रुपी ब्लॅक लेडी आपल्याकडे असावी असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. ही 'ब्लॅक लेडी' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीनं मिळवली आहे. यावर अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचं कौतुक केलं. 

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री  प्रियदर्शनी इंदलकरनं तिच्या आयुष्यातील पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहे. यावर सईनं खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. सईनं तिच्या इन्स्टाग्रामवर प्रियदर्शनीचा फिल्मफेअर ट्रॉफीसोबत फोटो शेअर केला. तिनं कॅप्शनमध्ये 'तिची पहिली ब्लॅक लेडी' असं म्हटलं. तसेच प्रियदर्शिनीचा खूप अभिमान वाटत असल्याचंही सई म्हणाली. सईची पोस्ट प्रियदर्शनीनेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करत आनंद व्यक्त केलाय. दरम्यान या सिनेमासाठी फिल्मफेअर मिळाल्याबद्दल अनेकांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय.

प्रियदर्शनी इंदलकरला 'फुलराणी' या मराठी सिनेमासाठी बेस्ट डेब्यू अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'फुलराणी' सिनेमात प्रियदर्शनीसोबत अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका होती. या सिनेमातले संवाद, प्रियदर्शनीचा अभिनय याची बरीच चर्चा झाली. प्रियदर्शनीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा गाजला. बॉक्स ऑफीसवर सिनेमाने संमिश्र कामगिरी केली. तुम्ही हा सिनेमा प्राईम व्हिडीओवर बघू शकता. 

प्रियदर्शनी ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून सर्वांचं मनोरंजन करतेयं.  पुण्याची विनम्र अभिनेत्री असा टॅग तिला या शोमुळे मिळाला. प्रियदर्शनीने 'ई टीव्ही मराठी' या वाहिनीवरील 'अफलातून लिटील मास्टर्स' या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. आज ती विविध सिनेमा आणि वेबसिरीजमधूनही चमकत आहे. प्रत्येक माध्यमांत प्रियदर्शनीने चांगला अभिनय करत लोकांचं प्रेम मिळवलं. 
 

Web Title: Sai Tamhankar praised Maharashtrachi Hasya Jatra Fame Priyadarshini For Winning First Filmfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.