"अमराठी कलाकारांना पहिल्या रांगेत बसवलं जातं आणि..." सई ताम्हणकरनं व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:34 IST2026-02-22T11:33:04+5:302026-02-22T11:34:35+5:30
आजवर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सईच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत.

"अमराठी कलाकारांना पहिल्या रांगेत बसवलं जातं आणि..." सई ताम्हणकरनं व्यक्त केला संताप
सई ताम्हणकर (Saie Tamhankar) हिने कलाविश्वात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. आजवर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सईच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. ती तिचे वैयक्तिक मत निर्भीडपणे व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. अशातच सईने पुन्हा एकदा एका ज्वलंत विषयावर आपलं रोखठोक मतं मांडलं. पुरस्कार सोहळ्यांमध्ये मराठी कलाकारांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर तिने कडाडून टीका केली आहे. "अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील दिग्गजांचा अपमान करतोय का?" असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
'विषय खोल'शी बोलताना सई ताम्हणकर म्हणाली, "आपण म्हणतो की मराठी बोला, मराठीसाठी आग्रह धरतो, पण, दुसरीकडे अनेकदा आपण पाहतो की, आजकाल पुरस्कार सोहळ्यांना इतर सिनेसृष्टीतील (अमराठी) कलाकारांना आमंत्रित केले जाते. मात्र, या प्रक्रियेत एक मोठी विसंगती दिसून येते. अमराठी कोणी आर्टिस्ट आले की त्यांना आपण पहिल्या रांगेत बसवतो आणि ज्या ज्येष्ठ कलाकारांनी ३०-४० वर्षे काम केलं आहे, त्यांना या भव्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेकदा मागच्या रांगेत स्थान दिले जाते. हे मला पटत नाही".
पुढे सई ताम्हणकर म्हणाली की, "टीआरपी वाढवण्यासाठी आणि सोहळ्याला 'ग्लॅमर' प्राप्त करून देण्यासाठी दुसऱ्या फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना अतोनात महत्त्व दिले जाते. आज मागे बसलेले हेच ज्येष्ठ कलाकार एकेकाळी इतके लोकप्रिय होते की, त्यांच्या सिनेमाची तिकिटे २००-३०० रुपयांत ब्लॅकने विकली जायची. दुसऱ्या इंडस्ट्रीमधून आलेली लोक काहीतरी मोडकतोडक मराठी बोलणार ते आपण सेलिब्रेट करतो. आपण स्वतःला किती सेलिब्रेट करतोय आणि त्यात आपल्याला खरोखर आनंद मिळतोय का? हे पाहणे गरजेचे आहे".