Ved Marathi Movie box office collection Day 4: ‘वेड’ने खरंच वेड लावलं...! रणवीरच्या ‘सर्कल’ मागे टाकत चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:02 IST2023-01-03T17:01:54+5:302023-01-03T17:02:43+5:30
Ved Marathi Movie box office collection Day 4: रिलीजआधीच ‘वेड’ या चित्रपटानं हवा केली होती. आता हा सिनेमा चित्रपटगृहांतही गर्दी खेचतोय...

Ved Marathi Movie box office collection Day 4: ‘वेड’ने खरंच वेड लावलं...! रणवीरच्या ‘सर्कल’ मागे टाकत चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी
रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) आणि जिनिलिया देशमुख ( Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ (Ved) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. होय, रितेशचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा तर जिनिलियाचा पहिलाच मराठी सिनेमा या अर्थाने या सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. रिलीजआधीच या चित्रपटानं हवा केली होती. आता हा सिनेमा चित्रपटगृहांतही गर्दी खेचतोय.
‘वेड’च्या चौथ्या दिवसाच्याबॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, चार दिवसांत या मराठी सिनेमाने एकूण 13.02 कोटींची कमाई केली आहे. ‘वेड’चा बजेट 15 कोटींचा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा आपला बजेट वसूल करणार, अशी खात्री जाणकार व्यक्त करत आहेत.
पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 3.25 कोटींवर आणि तिसऱ्या दिवशी 4.50 कोटींवर पोहोचला. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 3.02 कोटींचा गल्ला जमवला. ‘वेड’पुढे बॉलिवूडच्या सिनेमेही फिके पडले आहेत. रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ला मागे टाकत ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर धूम करतोय.
‘वेड’ या सिनेमात रितेश व जिनिलिया मुख्य भूमिकेत आहेत. रितेशने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे, शिवाय हा तिचा पहिला मराठी सिनेमा आहे. रिलीजआधी या सिनेमाची जोरदार चर्चा होती. सिनेमाच्या गाण्यांनीही धूम केली होती. अशात कधी एकदा हा सिनेमा रिलीज होतो, असं चाहत्यांना झालं होतं. 30 डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या.
क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा सत्या आणि त्याच्या सच्चा प्रेमाची गोष्ट वेड या सिनेमात पाहायला मिळते. शेखरअण्णा नावाचा गुंड सत्याचा पक्का वैरी आहे. तो का आणि कसा याची कथा चित्रपट पाहिल्यावरच समजेल. सत्याचे श्रावणीसोबत लग्न झालेलं आहे. लग्नाला सात वर्षे होऊन दोघांमध्ये एक दरी आहे. बेकार असलेला सत्या कायम दारू आणि सिगारेटच्या नशेत असतो. रेल्वेत काम करणारी श्रावणी त्याला दारूसाठी पैसे देते, सासरे काही बोलले तरी पतीच्या बाजूने बोलते, पतीसाठी वडीलांसोबतही भांडते. असं असूनही सत्या आणि श्रावणीमध्ये दुरावा का याची उत्तरं 12 वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये मिळतात, जी थिएटरमध्ये पहायला मजा येईल.