लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:24 IST2025-12-28T14:24:12+5:302025-12-28T14:24:42+5:30
गावी राहणारा मुलगा हवा की शहरी मुलगा हवा? रिंकू म्हणाली...

लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
'सैराट' सिनेमामुळे रातोरात स्टार झालेली मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा 'आशा' सिनेमा रिलीज झाला ज्याला गावागावात खूप प्रतिसाद मिळत आहे. रिंकुने आशा वर्करचं काम उत्तमरित्या केलं आहे. रिंकूला खूप कमी वयात यश मिळालं. सैराट आला तेव्हा ती फक्त १० वीत होती. नंतर तिने ३ वर्ष कामच केलं नाही. आता ती पुन्हा मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. वैयक्तिक आयुष्याबद्दल रिंकूने नुकताच खुलासा केला. तिला गावी राहणारा मुलगा हवा की शहरी मुलगा हवा? लग्नानंतर मुलाने काम करु दिलं नाही तर? यावर रिंकूने उत्तर दिलं आहे.
रिंकू राजगुरु मूळची अकलुजची आहे. तिचं कुटुंब तिथेच राहतं. तर रिंकू कामासाठी मुंबईत राहते. मात्र ती वेळ मिळाला की लगेच गावी जाते. 'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत रिंकूला लग्न, मुलगा कसा हवा, त्याने लग्नानंतर काम करुन दिलं नाही तर? असे प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, "मी शहरात किंवा गावात रमणारी अशी मुलगी नाही तर मी चांगली माणसं असतील तर कुठेही राहायला तयार असते. माझे आईवडील आज इथे राहत असते तर मी मुंबईत कायमस्वरुपी राहिले असते. माझं शहर-गाव असं नाही जिथे माझी माणसं भेटतील तिथे मी राहते आणि रमते. मुलगा चांगला असेल तर तो कुठेही राहत का असेना मला फकत पडत नाही."
लग्नानंतर काम करायला परवानगी दिली नाही तर? यावर रिंकू म्हणाली, "ते मी लग्नाआधीच स्पष्ट करुन घेईन. कारण कामाने मला ओळख दिली आहे. ज्या गोष्टी करताना आईवडीलांनीही कधी हात पकडला नाही तिथे दुसऱ्यानेही पकडू नये. मला ते स्वातंत्र्य हवं आहे. मी काहीही चुकीचं आणि वेगळं करते. तसं करत असेल तर मला आवर्जुन येऊन सांगा की हे तू चुकीचं करतीये. मग कोणीही असेल तरी मी ऐकते. पण कामापासून कधी थांबवू नये. इतकी वर्ष जितकं आपण कामाबरोबर जगतो ते कोणीतरी महिनाभरापूर्वी आयुष्यात आलेला माणूस जर हिसकावून घेत असेल तर त्यापेक्षा वाईट काहीच नाही. मग तो माणूसच नको. मला वाटतं प्रेम करताना पुढचा ज्याच्यावर प्रेम करतोय त्यावर आपलंही प्रेम असतं आणि आपण त्यासकट त्याला स्वीकारतो. त्यामुळे मग आपण काम करताना आवडत नाही. तुला आवडतंय ना? तू कर...असं असलं पाहिजे. जर कोणी थांबवत असेल तर मग त्याला इर्ष्या म्हणतात. त्यापेक्षा लग्नच नको. आपण कामाशी लग्न करु आणि काम करु."