रिंकू राजगुरूचं पैशांबाबत 'ते' विधान, नेटकरी ट्रोल करत म्हणाले "ही लेडी सचिन पिळगावकर"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:49 IST2026-02-19T12:48:58+5:302026-02-19T12:49:20+5:30
"माझ्याकडे किती पैसे आहेत, हे मलाच माहित नाही", रिंकू राजगुरूचा खुलासा

रिंकू राजगुरूचं पैशांबाबत 'ते' विधान, नेटकरी ट्रोल करत म्हणाले "ही लेडी सचिन पिळगावकर"
Rinku Rajguru: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झाला. आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रिंकू राजगुरू रातोरात स्टार झाली. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रिंकूला अख्खा महाराष्ट्र ओळखू लागला. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. सध्या रिंकु एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने 'सैराट' चित्रपटासाठी तिला किती मानधन मिळालं आणि त्या पैशाचं तिनं काय केलं, यावर भाष्य केलंय. तसेच रिंकूनं तिचं मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशांचे व्यवस्थापन कोण करतं, याबद्दलही खुलासा केला. जो ऐकून नेटकरीही थक्क झालेत.
नुकतंच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत रिंकूला 'सैराट' चित्रपटासाठी किती मानधन मिळाले, असा प्रश्न विचारला. यावर तिने आकडा सांगणे टाळले, पण त्या पैशांचा उपयोग कशासाठी केला हे सांगितले. रिंकू म्हणाली, "मला किती पैसे मिळाले हे मी सांगणार नाही, पण त्या पैशातून मी माझी दहावीची पुस्तकं विकत घेतली होती".
रिंकू पुढे म्हणाली, "मी कधीच माझ्याजवळ पैसे ठेवत नाही. मला आवडत नाही. मला फक्त एवढं कळतं की, एवढे-एवढे पैसे ठरले आहेत. मी बाबांकडे देते किंवा पूजाकडे देते. मला जसे पैसे लागतील, तसे त्यांच्याकडून मागून घेते. मला आता हे हवंय, हे घेऊन द्या किंवा मला पैसे द्या, मी जाऊन घेते. माझं अकाऊंट बाबा आणि पूजा मॅनेज करतात. माझ्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत, हेसुद्धा मला माहीत नाही. मी त्यांना विचारायलाही जात नाही. एखाद्या ट्रिपला जायचं असेल तर ती अरेंज करून द्या, असं त्यांना सांगते".
"अगदी काही दिवसांपूर्वीच माझ्या फोनमध्ये 'गुगल पे' सुरू करून देण्यात आलं आहे. माझ्याकडे पैसेच नसायचे. आता गुगल पे सुरू केल्याने, जिथे गरज लागते तिथे मी पैसे देते. पण मला पैसे जवळ ठेवायला आवडत नाही. माझ्याकडे काहीच नसतं. सगळं पूजा आणि बाबांकडे असतं. बाबा म्हणतात मला की तू शिक, तेव्हा मी त्यांना म्हणते की हो शिकेन. पण अजून तरी काही शिकले नाहीये. आपल्याला लहानाचं मोठं करताना त्यांनी हिशोबाचा विचार केला का? मला एवढंही माहीत आहे की माझ्या कमाईतला ते आठाणा किंवा एक रुपयाही वापरत नाहीत. पैसे जवळ ठेवणं, हिशोब करणं मला आवडत नाही", असं रिंकूने सांगितलं.