राकेश बापट म्हणतो 'मुंबई आपली आहे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:22 IST2018-12-26T13:18:33+5:302018-12-26T13:22:05+5:30
अभिनेते अरुण नलावडे, किशोरी शहाणे-वीज, नयन जाधव हे देखील या चित्रपटात हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ह्या सिनेमाला रुपेश गोंधळी यांनी संगीत दिले आहे. 'मुंबई आपली आहे' हा सिनेमा ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

राकेश बापट म्हणतो 'मुंबई आपली आहे'
प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात काहीतरी वेगळे आणि मोठे करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी हरप्रकारची धडपड माणूस करत असतो. या सगळ्यामध्ये आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी ते हट्टाला पेटतात आणि मिळेल तो मार्ग ते निवडतात. मग भलेही तो मार्ग चुकीचा का असेना. आणि यातूनच तो चुकीच्या मार्गावर जातो. याच संकल्पनेवर आधारित वंश एंटरप्राइजेस प्रस्तुत 'मुंबई आपली आहे' हा सिनेमा ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. मराठी चित्रपटात आधी कधीही न दिसलेला असा थरार 'मुंबई आपली आहे' या चित्रपटातुन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. १९९३ साली मुंबईमध्ये जी गुन्हेगारी होती त्यावरच आधारित आणि तत्कालीन मुंबईची चाळसंस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्रेमकथा या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला मिळेल. हिंदी आणि मराठी मध्ये आपल्या अभिनयचाही छाप पडणारा राकेश बापट हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका निभावत आहे. रोमँटिक हिरो ची प्रतिमा असलेला राकेश बापट या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाद्वारे राकेश त्याची 'चॉकलेट बॉय' ची इमेज पुसणार हे नक्की. या चित्रपटात राकेश सोबत मीनल पाटील हा नवीन चेहरा दिसणार आहे. तर हिंदी मालिका, चित्रपटामध्ये दिसणारा इकबाल खान हा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. इकबाल या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे, किशोरी शहाणे-वीज, नयन जाधव हे देखील या चित्रपटात हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
ह्या सिनेमाला रुपेश गोंधळी यांनी संगीत दिले आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती सुरेखा वामन पाटील यांनी केली आहे. तर कुणाल नैथानी हे या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. दमदार संवाद, तगडी स्टारकास्ट, ऍक्शनने भरलेला असा हा 'मुंबई आपली आहे' नक्की बघायलाच पाहिजे.