AI शत्रू की मित्र? राजेश मापुसकर यांनी मांडलं रोखठोक मत, दिला 'हा' मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:39 IST2026-01-05T16:39:35+5:302026-01-05T16:39:57+5:30
AI तंत्रज्ञान अनेकांसाठी सोयीचं असलं तरी यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याची भीती मागील काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे.

AI शत्रू की मित्र? राजेश मापुसकर यांनी मांडलं रोखठोक मत, दिला 'हा' मोलाचा सल्ला
Rajesh Mapuskar Opinion On Artificial Intelligence : जगभरात तंत्रज्ञान वेगाने बदलत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सध्या शिगेला पोहोचली आहे. AI मुळे भविष्यात माणसांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी यावर एक सकारात्मक आणि वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. राजेश मापुसकर सध्या 'चिरंजीवी हनुमान – द एटर्नल' या AI निर्मित सिनेमावर काम करत आहेत. हा ऐतिहासिक चित्रपट येत्या हनुमान जयंतीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं "AI एकतर तुम्हाला गिळंकृत करेल, किंवा तुम्ही तिला मित्र बनवून पुढे जाल" असे परखड मत मिड-डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी व्यक्त केले आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, राजेश म्हणाले की, "मला वाटत नाही की AI थेट धमकी आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, AI माणसांना रिप्लेस करणार नाही. ते केवळ प्रक्रिया जलद करेल. महत्त्वाचे हे आहे की, तुम्ही AI ला नियंत्रित करता की AI तुमच्यावर नियंत्रण ठेवतंय? हा तंत्रज्ञान केवळ पारंपरिक सिनेमा बनवण्याला मदत करेल. AI हा माणसांसाठी धोका नसून तो आपला मित्र आहे".
अॅनिमेशन आणि AI मधला फरक स्पष्ट करताना ते म्हणतात, "अॅनिमेशनमध्ये तुम्हाला पात्राच्या प्रत्येक हालचालीवर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागते. याउलट, AI हे एका संवादात्मक साधनासारखे आहे. जणू तुमच्यासोबत दुसरा एक मेंदू काम करत आहे. कधी कधी ते अनपेक्षित परिणाम देते, जे आश्चर्यकारक असू शकतात".
अलीकडेच प्रदर्शित झालेली 'महाभारत: एक धर्मयुद्ध' ही AI वेब सीरिज पाहिल्यानंतर राजेश यांनी त्यातून बरेच काही शिकल्याचे सांगितले. ते म्हणाले, "महाभारत कुठे कमी पडले आणि मी 'चिरंजीवी हनुमान'मध्ये काय सुधारणा करू शकतो, याचा मी अभ्यास केला आहे. मी टीझरवरच्या प्रत्येक कमेंट वाचतो, कारण प्रेक्षकांचा दृष्टिकोन समजून घेणे कोणत्याही निर्मात्यासाठी महत्त्वाचे असते" असेही त्यांनी नमूद केले. राजेश मापुसकर यांच्या मते, AI हे भविष्य आहे आणि त्याचा स्वीकार करून कथा सांगण्याची कला अधिक समृद्ध करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे.