'मुक्काम पोस्ट आडगाव'मध्ये पुरुषोत्तम बेर्डेंचा रंगमंचीय गावरान तडका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:18 PM2024-01-16T16:18:19+5:302024-01-16T16:18:36+5:30

रसिकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती नावीन्यपूर्ण, आकर्षक आणि बहारदार असते.

Purushottam Berde's theatrical Gavran Tadka in 'Mukkam Post Adgaon' | 'मुक्काम पोस्ट आडगाव'मध्ये पुरुषोत्तम बेर्डेंचा रंगमंचीय गावरान तडका

'मुक्काम पोस्ट आडगाव'मध्ये पुरुषोत्तम बेर्डेंचा रंगमंचीय गावरान तडका

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - नवीन वर्षात रंगभूमीवर नवीन नाटक आणण्याचा मान लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना मिळणार असल्याची बातमी 'लोकमत'ने यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार २४ जानेवारीला 'मुक्काम पोस्ट आडगाव' या नाटकात रसिकांना बेर्डेंचा रंगमंचीय गावरान तडका आणि प्रदीप अडगावकरांचा मराठवाडी ठसका मराठी अनुवायला मिळणार आहे.

रसिकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती नावीन्यपूर्ण, आकर्षक आणि बहारदार असते. आता ते 'मुक्काम पोस्ट आडगाव' हे नाटक रंगभूमीवर आणत आहेत. याचा शुभारंभ २४ जानेवारीला दुपारी ४ वाजता यशवंत नाट्यगृहात होणार आहे. अष्टविनायक प्रकाशित, स्नेहा प्रदीप प्रोडक्शन्स आणि अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकाद्वारे पुन्हा एकदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नवीन अभिनेते, अभिनेत्री, गायक, नर्तक आणि वादक पदार्पण करणार आहेत. 'रिव्ह्यू' या नाट्यप्रकारात मोडणाऱ्या फॉर्ममध्ये निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे नाटक २५ कलावंत तंत्रज्ञांच्या साथीने उभे केले आहे. याला मराठवाड्यातील मूळ आडगावमधून येऊन औरंगाबाद, पुणे, मुंबईनंतर संपूर्ण जग फिरलेले प्रदीप आडगावकर यांच्या आत्मनिवेदनातून अत्यंत नाविन्यपूर्ण असा नाट्याविष्कार बेर्डे मराठी रंगभूमीवर सादर करणार आहेत. हा नाट्यप्रकार संगीत, नाट्य, नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून पुढे जातो. 'मुक्काम पोस्ट आडगाव' हा नाट्यप्रयोग भव्य-दिव्य असा दृष्टी सौख्याचा आनंद देणारा असेल असा विश्वास दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केला आहे.

'मुक्काम पोस्ट आडगाव' हे नाटक म्हणजे मराठवाड्यातल्या एका खेडेगावातून मुंबई पुण्यात शिकून एका मोठ्या फार्मासिटिकल कंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचलेल्या अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा एका मूळच्या शेतकरीपुत्राची गोष्ट आहे, ज्याच्या नसानसांत मराठवाड्याची भाषा, संस्कृती, लोककला, साहित्य, कविता, संतकाव्य आणि तिथल्या खेड्यापाड्यातल्या रूढी प्रथा ठासून भरलेल्या आहेत. हा शेतकरीपुत्र बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यातल्या आपल्या आडगाव या खेडयात जातो. तिथले बदलत चाललेले लोकजीवन आणि संस्कृती पाहून आपल्या गतकाळाच्या तुलनेने अस्वस्थ होतो. गतकाळातल्या समृद्धीचे मोठ्या रसिकतेने आणि रसभरीत भाषेने पुनःप्रत्ययाचा आनंद रसिकांनाही देतो आणि स्वत:ही अनुभवतो.

Web Title: Purushottam Berde's theatrical Gavran Tadka in 'Mukkam Post Adgaon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.