"आम्हाला गाजावाजा करायचा नव्हता, कारण...", लाडक्या लेकाच्या साखरपुड्याबद्दल मंजिरी ओक स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:15 IST2026-04-08T18:13:15+5:302026-04-08T18:15:17+5:30
मुलाच्या साखरपुड्याबद्दल मंजिरी ओकची प्रतिक्रिया, म्हणाली-"आम्हाला गाजावाजा करायचा नव्हता, कारण...",

"आम्हाला गाजावाजा करायचा नव्हता, कारण...", लाडक्या लेकाच्या साखरपुड्याबद्दल मंजिरी ओक स्पष्टच बोलली
Manjiti Oak: अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय असणारं जोडपं आहे. प्रसाद ओक हा एक उत्तम अभिनेता आहेच त्याशिवाय तो एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. त्याची पत्नी मंजिरी देखील कायम चर्चेत असते. अलिकडेच प्रसाद आणि मंजिरीच्या लेकाचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. सोशल मिडियावर साखरपुड्यातील फोटो व्हायरल झाले आणि त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मंजिरीने लाडक्या लेकाच्या साखरपुड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुलाच्या इच्छेखातर त्यांनी साखरपुड्याबद्दल कुठेही सांगितलं नव्हतं.
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांना दोन मुले आहेत. सार्थक आणि मयंक अशी त्यांची नावं आहेत. अलिकडेच त्यांचा मोठा मुलगा सार्थकचा साखरपुडा झाला. सार्थकने जर्मनीमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तो लाईमलाइटपासून दूर राहणं पसंत राहतो. मात्र, अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर सार्थक ओकच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि सर्वत्र त्याचीच चर्चा होऊ लागली. 'अभिजात मराठी फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत मंजिरी ओकने यावर भाष्य केलं. लेकाच्या साखरपुड्याबद्दल बोलताना ती म्हणाली," इंडस्ट्रीतील अनेक लोकांना माझ्या मुलाचा साखरपुडा झाला याचा धक्का बसला. पण, जे प्रेक्षक वगैरे आहेत त्यांना वाटलं की हे दोघे किती लहान आहेत.मग त्यांचं लहान वयात का लग्न करत आहेत, असा अनेकांना प्रश्न पडला.पण, तसं नाही, आम्ही आता मुलाचं लग्न करण्याच्या मार्गावर आहोत. "
मग त्यानंतर मंजिरी ओक म्हणाली,"माझा मुलगा आता २५ वर्षांचा आहे. तो जर्मनीला असतो. तो तिथेच शिकला आहे आणि नोकरी करतो आहे. बऱ्यापैकी तो सेटल आहे. पण, अर्थात त्याला अजून खूप काम करायचं आहे. हे आमच्यासाठी सुद्धा अचानकच ठरलं आहे. शिवाय आम्हाला त्याचा कुठे गाजावाजा करायचा नव्हता. पण, आमची मैत्रीण अमृता खानविलकरने एक स्टोरी टाकली आणि सगळ्यांनाच कळलं."
पुढे मंजिरीने म्हटलं, "त्यात वाईट असं काहीच नाही. पण, माझा मोठा मुलगा जरा या मिडिया वगैरे या सगळ्यापासून लांब आहे. त्यामुळे फार काही गाजावाजा करायला नको, अशी त्याची इच्छा होती. पण, ज्यांना कळलं त्याचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे गेलो."असा मंजिरीने यावेळी सांगितलं.