हरवलेल्या वाटा जुळून आल्या; प्रसाद ओकच्या 'वडापाव' मधील प्रेमगीत 'जुळल्या वाटा' प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:29 IST2025-09-26T16:29:15+5:302025-09-26T16:29:48+5:30
प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' या बहुचर्चित चित्रपटातील 'हरवल्या वाटा' हे भावस्पर्शी गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. सोनू निगमच्या हृदयस्पर्शी आवाजातील हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता 'जुळल्या वाटा' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

हरवलेल्या वाटा जुळून आल्या; प्रसाद ओकच्या 'वडापाव' मधील प्रेमगीत 'जुळल्या वाटा' प्रदर्शित
प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' या बहुचर्चित चित्रपटातील 'हरवल्या वाटा' हे भावस्पर्शी गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. सोनू निगमच्या हृदयस्पर्शी आवाजातील हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता 'जुळल्या वाटा' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘हरवल्या वाटा’मध्ये जिथे दुरावा आणि वेदना जाणवली तिथे ‘जुळल्या वाटा’मध्ये तीच दुरावलेली नाती पुन्हा एकत्र येताना दिसतात. प्रेमातील कोमल भावना या गाण्यातून खुलून समोर येतात. हे एक प्रेमगीत असून गाण्याची मधुर धून व सुंदर शब्दांमुळे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. ‘जुळल्या वाटा’ला हर्षवर्धन वावरे यांचा मधुर आवाज लाभला असून कुणाल - करण यांनी सुमधुर संगीत दिलं आहे. तर मंदार चोळकर यांचे गोड शब्द या गाण्याला लाभले आहेत.
दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, " 'वडापाव’ मध्ये प्रत्येक गाणं काही तरी कथा सांगत आहे. ‘हरवल्या वाटा’ नात्यातील दुरावा मांडत होतं, तर ‘जुळल्या वाटा’ मध्ये त्याच नात्यांना नवी दिशा आणि आशा मिळते. हे गाणं चित्रपटाच्या कथेला पूर्णत्व देणारं आहे, असा मला विश्वास आहे." संगीतकार कुणाल-करण म्हणतात, " 'जुळल्या वाटा' हे गाणं प्रेमाचं गाणं आहे. या गाण्यातील प्रत्येक ओळ प्रेमाचा गोडवा वाढवते आणि धून त्याला नवी उंची देते. आम्हाला खात्री आहे की प्रेक्षक या गाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहतील आणि त्यांना ते मनापासून आवडेल."
एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे.
या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांना या झणझणीत 'वडापाव'ची चव चाखता येणार आहे.