"मी माझ्या सासू-सासऱ्यांबरोबर राहते..." प्रार्थना बेहेरे मुंबई सोडून 'या' ठिकाणी राहायला गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:44 IST2026-02-08T14:27:17+5:302026-02-09T11:44:34+5:30
प्रार्थना आपल्या सासू-सासऱ्यांसोबत निसर्गाच्या कुशीत स्थायिक झाली.

"मी माझ्या सासू-सासऱ्यांबरोबर राहते..." प्रार्थना बेहेरे मुंबई सोडून 'या' ठिकाणी राहायला गेली
Prarthana Behere : मुंबई स्वप्नांचं शहर आहे, अनेकांची स्वप्न इथे पूर्ण होतात. इथल्या मराठी संस्कृतीत मिसळणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत मुंबई मनापासून करते. मुंबईत हक्काचं घर असावं म्हणून प्रत्येक कलाकार धडपडत असतो. पण, झगमगाटाच्या या दुनियेत वावरताना कधी कधी शांततेचा शोध घेणं कठीण होऊन बसतं. असंच काहीसं लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसोबत घडलं. त्यामुळे मुंबईच्या गजबजाटातून प्रार्थना बेहेरे बाहेर पडली. प्रार्थनाने केवळ मुंबई सोडली नाही, तर ती आता आपल्या सासू-सासऱ्यांसोबत निसर्गाच्या कुशीत स्थायिक झाली. प्रार्थनाने हे पाऊल का उचललं? चला तर जाणून घेऊया.
प्रार्थना बेहेरे म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव. 'पवित्र रिश्ता' पासून 'माझी तुझी रेशीमगाठ' पर्यंत तिने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पण यश आणि प्रसिद्धीच्या या शिखरावर असताना प्रार्थना एका गोष्टीची उणीव भासत होती, ती म्हणजे 'वेळ'. आरपारच्या मुलाखतीत प्रार्थनाने मान्य केलं की, मुंबईत असताना ती आणि तिचा पती अभिषेक हे एकाच घरात राहूनही एकमेकांसाठी वेळ काढू शकत नव्हते. तो सकाळी ८ ला कामावर जायचा आणि रात्री १२ ला परतायचा. तर प्रार्थना स्वतः शूटिंगमध्ये व्यस्त असायची.
कोव्हिडच्या काळानं प्रार्थनाला जगण्याची नवी दृष्टी मिळाली. कामाच्या व्यापात आपण जगायचंच विसरलो आहोत, याची तिला जाणीव झाली. त्यामुळे प्रार्थनानं आपल्या पतीसह अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. अलिबागला गेल्यावर तिचं आयुष्य कसं बदललं? याबद्दल प्रार्थना म्हणाली, "आता मी माझ्या सासू-सासऱ्यांबरोबर राहते. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता येतात. अलिबागला मी अभिनेत्री नसते, तर मी माझ्या कुटुंबाचा एक भाग असते. तिथे आम्हाला आयुष्याला एक वेगळी शिस्त लावता आली आहे. जेव्हा आम्हाला काम असतं, तेव्हा आम्ही मुंबईत चार दिवस असतो. काम करतो आणि तीन दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवार आम्ही अलिबागला जातो".