Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:16 IST2025-10-04T14:15:04+5:302025-10-04T14:16:18+5:30
Veteran Actress Sandhya Shantaram of 'Pinjara' fame Passes Away: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे.

Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
Sandhya Shantaram Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. संध्या या सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी ट्विट करून ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले की, भावपूर्ण श्रद्धांजली! पिंजरा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!
भावपूर्ण श्रद्धांजली !
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 4, 2025
‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह… pic.twitter.com/Gsdq5KuXP9
संध्या शांताराम यांचं खरं नाव विजया देशमुख होते. त्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. तसेच त्या दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या मावशी होत्या. रंजना यांनी त्यांच्या अभिनय आणि नृत्याचे धडे मावशीकडूनच गिरविले होते. संध्या शांताराम एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच दिग्गज नृत्यांगणा म्हणूनही ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अनेक भूमिकांमध्ये त्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. त्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अमूल्य आहे. विशेषत: 'पिंजरा' चित्रपटामुळे त्यांचे नाव आजही मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. 'पिंजरा'तील त्यांच्या नृत्याची आणि अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. १९५९ साली आलेल्या व्ही. शांताराम यांच्या नवरंग सिनेमातून संध्या यांनी कमाल दाखवली होती. 'अरे जा रे हट नटखट' हे त्यांचे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे. 'अमर भूपाळी', 'दो आँखे बारह हात', 'नवरंग', 'जल बिन मछली नृत्य बिन बिजली', 'चंदनची चोळी अंग अंग जाळी' आणि 'झनक झनक पायल बाजे' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.