वयाच्या १० व्या वर्षी या सिनेमातून निवेदिता सराफ यांचं इंडस्ट्रीत पदार्पण, अशी मिळालेली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:53 IST2025-10-09T13:52:43+5:302025-10-09T13:53:09+5:30
Nivedita Saraf : अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकताच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाचा एक खास किस्सा सांगितला आहे.

वयाच्या १० व्या वर्षी या सिनेमातून निवेदिता सराफ यांचं इंडस्ट्रीत पदार्पण, अशी मिळालेली संधी
अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी नुकताच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाचा एक खास किस्सा सांगितला आहे. 'परिवर्तन' या चित्रपटातून त्यांनी अवघ्या दहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. विशेष म्हणजे, एका अनपेक्षित भेटीमुळे त्यांना ही भूमिका मिळाली. मराठीतील 'पहिला रंगीत चित्रपट' म्हणून शूटिंग झालेल्या या सिनेमामागील त्यांची आठवण काय आहे, जाणून घ्या!
निवेदिता सराफ यांनी नुकतेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना आठवण सांगितली. त्या म्हणाल्या की, पप्पांचं ते गाणं होतं ते माझ्या रे प्रितीफुलाचं शूटिंग चाललं होतं. मला वाटतं संभाजीपार्कमध्ये पुण्याला होतं. मला आता निश्चित आठवत नाही कुठेतरी पुण्याच्या त्या पार्कमध्ये होतं. संभाजी पार्कमध्ये होतं, की बंड गार्डनला होतं आठवत नाही. तर तिकडे मी आम्ही बघायला गेलो होतो मी, माझी मोठी बहीण आणि आई. खूप ऊन होतं आणि अशी खुर्ची होती तर अनुपमाने मला असं तिच्या मांडीवर घेतलं होतं.
अशी मिळाली अभिनयाची संधी
त्यावेळी प्रभाकर गोखले हे राजूभाऊंना भेटायला तिथे आले होते. त्यांनी निवेदिता यांना पाहिले आणि अनुपमाला म्हणाले, "अगं रेखा, ही गजनची मुलगी तुझ्यासारखी दिसते!" त्यानंतर त्यांनी लगेच निवेदिता यांना विचारले, "तू सिनेमात काम करशील का?" यावर निवेदिता यांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्साहाने उत्तर दिले, "हो, आईला विचारते." त्यावेळी आई हसली, पण वडील लगेच म्हणाले, "हो, करेल करेल!", असं निवेदिता यांनी सांगितलं. हा चित्रपट म्हणजे 'परिवर्तन'! यामध्ये निवेदिता सराफ यांनी अनुपमाच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. निवेदिता सराफ यांचा हा पहिला चित्रपट होता, तेव्हा त्या फक्त १० वर्षांच्या होत्या.
'मराठीतील पहिला रंगीत चित्रपट'
निवेदिता सराफ यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, "खरं तर या सिनेमाचं शूटिंग मराठीतील पहिला रंगीत चित्रपट म्हणून सुरू झालं होतं, पण तो रिलीज मात्र आधी झाला नाही. त्याच्या आधी शांताराम बापूंचा 'पिंजरा' रिलीज झाला." त्यामुळे 'पिंजरा' हा मराठीतील पहिला रंगीत चित्रपट ठरला. पण 'परिवर्तन' या सिनेमाची सुरुवात 'मराठीतील पहिला रंगीत चित्रपट' अशी झाली होती आणि हाच माझा पहिला चित्रपट होता, असे निवेदिता सराफ यांनी यावेळी सांगितले.