"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:43 IST2025-09-26T16:38:42+5:302025-09-26T16:43:10+5:30
भार्गवचा भाऊ ओमकार जगतापने पोस्टमधून भावाचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच कमी लेखणाऱ्यांना चपराकही दिली आहे.

"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात चार मराठी बालकलाकारांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'नाळ २' फेम भार्गव जगताप यालाही सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले. भार्गवचं सर्वत्र कौतुकही होत आहे. खुद्द बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर भार्गवची पाठ थोपटली. भार्गवला नीट बोलता येत नाही म्हणून हिणवणाऱ्यांसाठी त्याच्या भावाने खास पोस्ट शेअर केली आहे.
भार्गवचा भाऊ ओमकार जगतापने पोस्टमधून भावाचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच कमी लेखणाऱ्यांना चपराकही दिली आहे. पोस्टमध्ये तो म्हणतो, "तुम्हाला मानलं पाहिजे भार्गवचा एवढा PROBLEM असून सुद्धा तुम्ही त्याला समजून घेताय. भार्गवला जमेल ना ह्या जगात Compete करायला? नाही जरा ISSUE आहे ना त्याचा? भार्गवला तुम्हालाच सांभाळायच आहे एकट्याला नाही जमणार त्याला बोलता येत नाही ना. भार्गवचा एवढा बोलण्याचा ISSUE आहे तुम्हाला तरी कळतं का काय बोलतो?".
पुढे तो म्हणतो, "ज्या भार्गवचा बोलण्याचा ISSUE होता त्याच भार्गवचा आवाज आज दिल्ली पर्यंत पोहोचलाय. त्याला आम्ही काय सांभाळून घेणार त्याची दखल खुद्द आपल्या देशाने घेतली. तो काय बोलतोय ते संपूर्ण भारताला कळलंय. त्याला आम्ही सांभाळून घ्यायची गरज नाही कारण आता त्याचा PROBLEM राहिला नाही आहे. लोकांनी त्याच्या बोलण्याला नाही त्यालाच समजून घेतलंय. आयुष्यात खूप कष्ट बघितले आहेस तू भार्गव आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोतच. पण तरी ही हे यश फक्त तुझ आहे तुझ्या जिद्दीच आहे. Proud of you Love you शेवटी एवढंच बोलेन कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...".